ग्रामपंचायत सदस्यांना अतिक्रमण भोवले : सरपंचासह चार सदस्य अपात्र
शिरपूर तालुक्यातील वाडीतील सदस्यांना उपजिल्हाधिकार्यांनी ठरवले अपात्र
शिरपूर : तालुक्यातील वाडी येथील ग्रामपंचायत सदस्यांना अतिक्रमण भोवले असून उपजिल्हाधिकारी यांच्या आदेशाने चार सदस्य अपात्र घोषित करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्ते रज्जाक पटेल (रा.वाडी बु.॥) यांनी तक्रार दाखल केली होती.
अतिक्रमणाच्या तक्रारीत आढळले तथ्य
दाखल तक्रारीनुसार सरपंच व सदस्य यांनी अतिक्रमण केल्याने दोषी आढळून आल्याने सरपंच अनिता भरत भिल, सरपंच पती तथा सदस्य भरत दशरथ भिल सरस्वती शंकर पवार आणि आशाबाई नाना ठाकरे यांचा समावेश आहे.
तालुक्यातील वाडी बु.॥, ग्रामपंचायत 2019 मध्ये सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. तक्रारदार रज्जाक पटेल याने निवडून आलेल्या काही सदस्य व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी अतिक्रमण केले असल्याची लेखी तक्रार गटविकास अधिकारी व जिल्हा अधिकारी यांच्याकडे केली होती.

या पदाधिकार्यांना केले अपात्र
दाखल तक्रारीनुसार पंचायत समितीचे, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी यांनी केलेल्या चौकशी दरम्यान ग्रामपंचायत सरपंच, सरपंच पती व इतर दोन सदस्य यांनी अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला होता. त्यानुसार धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी शुभांगी पाटील यांनी शिरपूर तालुक्यातील वाडी बु.॥ ग्रामपंचायतीच्या सरपंच अनिता भरत भिल, सरपंच पती तथा सदस्य भरत दशरथ भिल सरस्वती शंकर पवार आणि आशाबाई नाना ठाकरे याचे ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य पदावरून अपात्र ठरवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

