विद्युत वाहिनीचे बोगस काम करणार्‍या ठेकेदारावर हवी कारवाई

राजुरा येथील शेतकर्‍याची मागणी ः लोकप्रतिनिधींनी घालावे लक्ष


मुक्ताईनगर : तालुक्यातील वीज वितरण कंपनीमार्फत राजुरा परीसरातील शेतीच्या थ्री फेज कनेक्शन सिंगल डीपीसाठी विद्युत वाहिनी टाकण्यात आली मात्र ठेकेदारामार्फत झालेल्या कामानंतर राजुरा शिवारातील शेतकर्‍यांच्या शेतातून विजेचे तार व खांब टाकण्यात आले. हे खांब रोवण्यासाठी संबंधित ठेकेदाराने आवश्यक त्या खोलीचे खड्डे न खोदता वरच्यावर गड्डे खोदल्याचे बाब समोर आली असून त्यामुळे अवघ्या सहा महिन्यात हे विजेचे खांब जमिनीकडे झुकले त्यामुळे विद्युत तारा य सुरक्षित अंतरापेक्षा खाली आल्याने अप्रिय घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.

दोषी ठेकेदारावर कारवाईची मागणी
मे महिन्यात काम करण्यात आले त्यावेळी शेतात पीक नसल्यामुळे शेतकरी शेतात जात नव्हते मात्र आता पिकांचा हंगाम असल्याने शेतकर्‍याचे शेतात जाणे-येणे असून शेतकर्‍यांच्या उभ्या पिकात काम केले जात असल्याने शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. शेतकर्‍यांनी ठेकेदारास विचारणा केली असता संबंधित ठेकेदार शेतकर्‍यांना दमदाटी करीत अरेरावीची भाषा वापरत असल्याचा आरोप होत आहे. कमी खोलीचे गड्डे खोदून खांब उभे करतांना मजबुतीसाठी आवश्यक उपाय योजना ठेकेदाराने केली नसल्याने भविष्यात अप्रिय घटना घडण्याची भीती आहे. दोषी ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राजुरा येथील शेतकरी श्रावण काशीनाथ धाडे यांनी कुर्‍हा-वढोदा येथील उपअभियंता नीलकंठ राठोड यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !