कौटुंबिक मतभेद टोकाला : गर्भवती पत्नीचा खून करीत नवविवाहित तरुणाची आत्महत्या
बीड : तालुक्यातील वैतागवाडी येथे नवविवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली तर त्याच्या गरोदर पत्नीचा संशयास्पद मृतदेह 16 डिसेंबर रोजी आढळला होता. दरम्यान, उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर तरुणाच्या पत्नीचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी शुक्रवारी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मृत तरुणावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना कौटुंबीक कारणातून झाल्याचे समोर येत आहे.
कौटुंबिक वादातून घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड तालुक्यातील वैतागवाडी येथील तरुण राजेश भालचंद्र जगदाळे ( 25) याला दारूचे व्यसन होते. 11 महिन्यांपूर्वी त्याचे गावातीलच दीपाली (20) या मुलीशी विवाह झाला होता. दरम्यान, गुरूवारी दुपारी साडेतीन वाजता राजेशने घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले, तर आठ महिन्यांची गरोदर असलेल्या त्याची पत्नी दीपालीचा मृतदेह पलंगावर आढळला होता. नेकनूर स्त्री रुग्णालयात दोघांचीही उत्तरीय तपासणी करण्यात आली. यानुसार, दीपालीचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे उघड झाले आहे.







