सैन्यात नोकरीच्या आमिषाने हिंगोण्यातील शेतकर्‍याला लाखाचा गंडा


फैजपूर, ता.यावल : यावल तालुक्यातील हिंगोणा येथील शेतकर्‍याला मुलाला सैन्यात लावून देण्याचे आमिष दाखवत एक लाखांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी तीन जणांविरोधात फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

न्हावीच्या आरोपींविरोधात गुन्हा
यावल तालुक्यातील हिंगोणा येथील शेतकरी शांताराम मांगो तायडे (52) हे शेती करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा गौरव याला सैन्यात लावून देण्याचे आमिष दाखवत संशयीत आरोपी केतन मधुकर पाटील, मधुकर पाटील, शोभाबाई मधूकर पाटील (सर्व रा.न्हावी, ता.यावल) यांनी तीन लाख रुपयांची मागणी केली होती. शेतकरी शांताराम तायडे यांच्याकडून 30 मे 2020 रोजी एक लाख रुपये अ‍ॅडव्हॉन्स म्हणून दिले. सोबत मुलगा गौरवचे बारावी पास झाल्याचे कागदपत्र आणि दोन फोटो दिले होते. दरम्यान आजपर्यंत कोणतेही काम न झाल्याने शेतकरी शांताराम तायडे यांनी पैश्यांची मागणी केली असता संशयीत आरोपी केतन पाटील यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर शिवीगाळ करून, ‘तुमच्याकडे काय लेखी पुरावा आहे का, तुम्ही कोठेही जा, काहीही होणार नाही, असे बोलून जातीवाचक शिविगाळ आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या संदर्भात शेतकरी शांताराम तायडे यांनी फैजपूर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयीत आरोपी केतन मधुकर पाटील, मधुकर पाटील, शोभाबाई मधूकर पाटील (सर्व रा.न्हावी, ता.यावल) विरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे करीत आहे.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !