खान्देश वर्च्युअल रनमध्ये भुसावळ रनर्सचा उस्फुर्त सहभाग
भुसावळ : जळगाव येथील जळगाव रनर्स ग्रुप आयोजित खानदेश वर्च्युअल रन 2021 या 21 किमी, 10 किमी, 5 किमी व 3 किमीच्या रनिंग मध्ये भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनच्या साठहून अधिक धावपटूंनी यशस्वी सहभाग नोंदविला. 18 व 19 डिसेंबर रोजी धावपटूंनी आपल्या सोयीनुसार व वेळेनुसार स्वतःच्या शहरातून यामध्ये सहभाग नोंदवायचा होता. दरम्यान, अॅपमधील नोंदवलेल्या अंतराचा फोटो अपलोड केल्यानंतर यशस्वी धावपटूंना आयोजकांतर्फे प्रमाणपत्र, पदक व टी-शर्ट प्रदान करण्यात येईल, अशी माहिती प्रवीण फालक यांनी दिली.
भुसावळातील धावपटूंचा यशस्वी सहभाग
21 किमीच्या धावपटूंसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण, झेडटीएस- पुन्हा परत नाहाटा चौफुली तेथून परत येऊन वसंत टॉकीज समोरून जळगाव रोडवरील वाय पॉईंट व तेथून पुन्हा क्रीडांगणावर परत असा मार्ग ठरविण्यात आला. 21 किमीच्या श्रेणीत डॉ. नीलिमा नेहेते व प्रिया पाटील या महिला धावपटूंनी सहभाग नोंदविला होता. 10 किमी साठी झेडटीएस मार्ग वगळता 21 किमीसाठी असणारा शहरातील जामनेर रोड व जळगाव रोडवरील मार्ग कायम ठेवण्यात आला. ऐश्वर्य वर्मा व संस्कार पाटील या बालकांनी देखील 10 किलोमीटरमध्ये यशस्वी सहभाग नोंदविला. पाच किलोमीटरसाठी क्रीडांगण ते नाहाटा चौफुली व परत क्रीडांगण तर तीन किलोमीटरसाठी क्रीडांगण ते अष्टभुजा मंदिर व परत क्रीडांगण असा मार्ग होता. धावपटूंचे जळगाव रनर्स ग्रुपच्या किरण बच्छाव, विक्रांत सराफ, डॉ. राहुल महाजन, डॉ. सोनाली महाजन, उमेश महाजन, ज्ञानेश्वर बढे या सदस्यांनी सर्व धावपटूंचे विशेष अभिनंदन केले.


