आदर्श गाव समितीचे अध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांना भुसावळ भेटीचे निमंत्रण
अहमदनगर : आदर्श गाव हिवरेबाजार हे राज्यासह देशात प्रसिध्द असून या गावामध्ये विविध उपाययोजना दुष्काळात राबविण्यात आल्या तसेच गावाने कोरोनावर मात केल्यानंतर येथील हिवरेबाजार पॅटर्न प्रकाशझोतात आला. या गावचे माजी सरपंच तथा आदर्श गाव समितीचे अध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांची नुकतीच भुसावळचे ज्येष्ठ माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांनी भेट घेत त्यांचा सत्कार केला तसेच भुसावळ भेटीचे निमंत्रण दिले.
भुसावळकरांना होणार लवकरच मार्गदर्शन
हिवरेबाजार येथील राहत्या घरी आदर्श गाव समितीचे अध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांचा सत्कार करण्यात आला तसेच भुसावळ तालुक्यात आपण यावे व आदर्श ग्रामपंचायतीबाबत अमूल्य मार्गदर्शन करण्याबाबत विनंती करण्यात आली. भुसावळ भेटीवर येण्याचे आश्वासन यावेळी पवार यांनी शिष्टमंडळाला दिले. प्रसंगी समाजसेवक संजय दत्तु आवटे, सचिन ठाणगे, सुभाषसेठ सूंबे, नंदू चेमटे, गौरव आवटे आदींची उपस्थिती होती.
पहिले सरपंच म्हणून निवडून येण्याचा मान
हिवरेबाजार येथील माजी सरपंच पोपटराव पवार यांचे शिक्षण एम.कॉम.पर्यंत झालं आहे. 1989 साली हिवरे बाजार येथील पहिले तरुण सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर गावातील जल संधारण, मृद संधारण आणि वनसंधारण या कामामध्ये स्वतःला झोकून देत गावाचा कायापालट केला. आज हिवरे बाजार पूर्णतः दुष्काळमुक्त झाले असून या राज्यात हिवरे बाजार पॅटर्न म्हणून प्रसिद्ध आहे तसेच त्यांनी पाणी फाऊंडेशनमध्ये देखील सहभाग घेतला. पाणी आणि स्वच्छता यापुरतंच मर्यादित न राहता पोपटराव यांनी अनेक सामाजिक विषयावर कार्य केले आहे.


