पाचोर्यातील युवकाचा अपघाती मृत्यू : दुसरा गंभीर जखमी
मालवाहू टाटा मॅजिक व मोटरसायकलची समोरासमोर धडक
पाचोरा : शहरात मालवाहू टाटा मॅजिक व दुचाकीची समोरासमोर धडक होवून पाचोरा शहरातील बाहेरपूरा भागातील 24 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता हा अपघात झाला. जखमीवर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
समोरा-समोर धडकली वाहने
शहरातील रेल्वे पुलाजवळील दैवयोग मंगल कार्यालयाननजीक शुक्रवार., 24 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पाचोर्याकडून भडगावकडे भरधाव मालवाहू टाटा मॅजिक (क्रमांक एम.एच.04 ई. वाय. 1489) ने भडगावकडून पाचोराकडे जाणार्या दुचाकी (क्रमांक एम.एच. 19 सी.डी. 3708) ला जोरदार धडक दिल्याने मोटरसायकल वरील नईम खान युनुस खान (24, बाहेरपूरा, पाचोरा) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याच्यासोबत असलेला संतोष खेमराज चव्हाण (21, रा.वडगाव जोगे, ता.पाचोरा) हा तरुण गंभीर जखमी झाला.




काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे निधन
मयत नईम खान व संतोष चव्हाण हे हात मजुरीचे काम करत आपले दैनंदिन काम आटोपून घरी जात असतांनाच हा अपघात झाला. जखमी संतोष चव्हाण याच्यावर पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत नईम युनुस खान हा पाचोरा काँग्रेसचा कार्यकर्ता होता. त्याच्या अकाली निधनाने काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी दु:ख व्यक्त करत घटनास्थळी धाव घेऊन परीस्थितीबाबत माहिती जाणून घेतली. मयत नईम खान युनुस खान याच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, लहान मुलगी, एक भाऊ, दोन बहिणी असा परीवार आहे.
