शाळांना अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : आमदार डॉ.सुधीर तांबे यांची रावेरात ग्वाही
रावेर : शासनाकडून शाळांना अनुदान मिळवून देण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असून कर्मचार्यांना मिळणार्या जुनी पेन्शन योजनेचा पाठपुरावा सुरू आहे, पवित्र पोर्टल उठवून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी भरतीसाठी विधान परीषदेत आवाज उठवण्यात येणार असून शिक्षक-शिक्षकेतर यांचे वेतन राष्ट्रीयीकृत बँकेतून होण्यासाठी प्रयत्न केले जातील शिवाय संस्थाचालकांना वेतनेतर अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही शिक्षक आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी येथे दिली. रावेर शिक्षण संवर्धक संघ रावेर संचलित सौ.के.एस.ए.गर्ल्स हायस्कूलमध्ये झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे.के.पाटील होते.
यांची होती उपस्थिती
मेळाव्यात परीसरातील संस्थाचालक मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पदवीधर, वकील मंडळी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक रावेर शिक्षण संवर्धक संघाचे चेअरमन प्रा.प्रकाश मुजुमदार यांनी केले. संस्थाचालक राजीव पाटील (अध्यक्ष भगवती शिक्षण प्रसारक मंडळ रावेर), रवी पवार (अध्यक्ष स्वामी शिक्षण संस्था, रावेर), दिलीप अग्रवाल (अध्यक्ष शिवप्रतिष्ठान रावेर) यांनी आपल्या मनोगतात शिक्षण क्षेत्रातील अनेक समस्या मांडल्या. विविध शैक्षणिक सामाजिक संघटनांनी आपल्या मागण्यांसंदर्भात निवेदन दिले. याप्रसंगी अहमदनगर जिल्हा माध्यमिक पतपेढीचे संचालक चांगदेव खेमनर, नगराध्यक्ष दारा मोहम्मद जाफर मोहम्मद, रावेर शिक्षण संवर्धक संघाचे अध्यक्ष कन्हैयालाल अग्रवाल, उपाध्यक्ष अशोक वाणी, संचालक शीतल वाणी, विकास देशमुख, डॉ.पी.टी.पाटील, डॉ.दत्तप्रसाद दलाल, प्रा.डी.एस.चौधरी, ग.स.सो.माजी संचालिका कल्पना दिलीप पाटील, डॉ.सुभाष पाटील, माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
पदवीधर मेळाव्याच्या यशस्वितेसाठी सरदार जी.जी.हायस्कूलचे मुख्याध्यापक शिरीष वाणी, के.एस.ए.गर्ल्स हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक जयंत कुलकर्णी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन शैलेश रमेश राणे यांनी तर आभार प्रा.बी.एल.सरोदे यांनी मानले. पदवीधर मेळाव्यानंतर आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी रावेर वकील संघ व रावेर तालुका काँग्रेस कमिटीला सदिच्छा भेट दिली.


