अॅड.रोहिणी खडसेंवर हल्ला करणार्यांना 24 तासात अटक करा : मुक्ताईनगरात राष्ट्रवादी आक्रमक
जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिले कारवाईचे आश्वासन : अवैध धंदे हद्दपार करण्याची मागणी
मुक्ताईनगर : माजी मंत्री खडसे यांच्या कन्या अॅड.रोहिणी खडसे यांच्यावर पिस्टल व तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना सोमवारी रात्री नऊ वाजता मानेगाव फाट्याजवळ घडल्यानंतर मुक्ताईनगर तालुक्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. हल्लेखोर हे शिवसैनिक असल्याची फिर्याद अॅड.रोहिणी खडसे यांनी दिल्यानंतर आरोपींना 24 तासात अटक करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी सकाळी तासभर राष्ट्रवादी पदाधिकार्यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली. महिलांवर हल्ले करणार्यांवर कठोर कारवाई करावी या घोषणाबाजीने शहर दणाणले तसेच शहरासह तालुक्यातील अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.


कारवाईच्या आश्वासनानंतर आंदोलक शांत
प्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे व तहसीलदार श्वेता संचेती यांनी निवेदन स्वीकारले. डॉ.मुंढे यांनी लवकरच दोषींवर कारवाई करून अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले. प्रसंगी अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्यासह वरणगाव, बोदवड, सावदा येथील पोलिस अधिकारी व मोठ्या प्रमाणात पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
यांचा आंदोलनात सहभाग
ठिय्या आंदोलनात जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, पंचायत समिती सभापती विकास पाटील, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, विलास धायडे, संदीप देशमुख, सईद खान, राजु माळी, संजय कोळी, प्रभारी नगराध्यक्षा मनिषा पाटील, प्रवीण पाटील, बापू ससाणे, पवन पाटील, ईश्वर रहाणे, निता पाटील, रंजना कांडेलकर, बी.सी.महाजन, रामभाऊ पाटील, सुनील कोंडे, बबलु सापधरे, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, किसान सेल अध्यक्ष सोपान पाटील, संजय माळी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

