नवीन वर्षाचे स्वागत करताय मग या सूचनांचे पालन करणे गरजेचे

जळगाव जिल्हाधिकार्‍यांनी जारी केल्या नवीन मार्गदर्शक सूचना !


जळगाव : कोरोना विषाणुच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये “ओमिक्रॉन” ही नवीन विषाणु प्रजाती आढळुन आल्यामुळे संसर्गाचा अधिक धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरीकांमध्ये/रहिवाशांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरीकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणुन मोठ्या प्रमाणात एकत्र न येता या वर्षी 31 डिसेबर, 2021 (वर्ष अखेर) व नूतन वर्ष 2022 चे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केल्या आहेत.

साधेपणाने करावे नववर्षाचे स्वागत
कोरोनाच्या अनुषंगाने शुक्रवार, 31 डिसेंबर, 2021 रोजी व शनिवार, 1 जानेवारी, 2022 रोजी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतोवर घरीच साधेपणाने साजरे करावे. मदत व पुनर्वसन विभाग, मुंबई यांच्या उपरोक्त शुक्रवार, 24 डिसेंबर, 2021 रोचीच्या आदेशान्वये राज्यात शनिवार, 25 डिसेंबर 2021 पासून रात्री 9.00 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.





नववर्षाच्या स्वागत कार्यक्रमांना मर्यादा
31 डिसेंबर, 2021 व नूतन वर्ष 2022 चे स्वागताकरीता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसन क्षमतेच्या 50 टक्केपर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या 25 टक्क्यांच्या मर्यादीत उपस्थित राहण्यास परवानगी असेल. या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्स राखले जाईल तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच त्या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी.

सोशल डिस्टन्स राखणे गरजेचे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरीकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे. 31 डिसेंबरच्या दिवशी नागरीकांनी बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

मिरवणुका काढण्यास बंदी
नव वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणूकांचे आयोजन करण्यात येऊ नये. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांना आरोग्य व स्वच्छेतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.

फटाक्यांची आतषबाजी करण्यास मनाई
फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये, ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदीचे काटेकोर पालन करण्यात यावे. कोविड-19 विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणू प्रजातीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगरविकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर अनुपालन करणे बंधनकारक राहील तसेच या परिपत्रकांनतर व 31 डिसेंबर, 2021 व नूतन वर्ष 2022 सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सुचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !