धुळ्यासह जळगाव जिल्ह्यात धुमाकूळ घालणारे चोरटे धुळे गुन्हे शाखेच्या जाळ्यात


भुसावळ/धुळे : धुळे व जळगाव जिल्ह्यात धुमाकूळ घालणार्‍या अट्टल दोन दरोडेखोरांच्या धुळे गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींकडून तब्बल नऊ चोर्‍यांसह दरोड्यातील गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यंत्रणेला यश आले आहे. राजपालसिंग अजयसिंग भादा (दंडेवालाबाबा नगर, मोहाडी) व बाळूसिंग दिलीपसिंग टाक (तिर्थपुरी, ता.घनसावंगी, जि.जालना) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींचे आणखी तीन साथीदार असून ते पसार झाले आहेत. आरोपींच्या ताब्यातून 30 हजार 40 रुपयांच्या रोकडसह दुचाकी मिळून 73 हजार 590 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

नऊ गुन्ह्यांचा उलगडा
धुळ्यातील सतीश लक्ष्मीचंद मुथा (माधव कॉलनी, ऐंशी फुटी रोड, धुळे) यांच्या मुथा अ‍ॅक्सीडेंट हॉस्पीटलमधील मेडिकल स्टोअरमधून 14 ते 15 डिसेंबरदरम्यान चोरट्यांनी 55 हजारांची रोकड लांबवली होती. या प्रकरणी धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा मोहाडीतील राजपालसिंग भादा याने साथीदारांसोबत केल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी पहाटे त्याच्यासह बाळुसिंग टाकसह मुसक्या आवळण्यात आल्या तर अन्य तिघे संशयीत अंधाराचा फायदा घेत पसार झाले. आरोपींच्या सखोल चौकशीनंतर त्यांनी नऊ चोर्‍यांसह घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. त्यात धुळे शहर, चाळीसगाव रोड पोलिस ठाणे, धुळे तालुका पोलिस ठाणे, पारोळा पोलिस ठाणे, अमळनेर शहरातील दोन तसेच मालेगाव छावणीसह अंबरनाथ येथील शिवाजी नगर तसेच कळवा, जि.ठाणे येथे केलेल्या चोरीची कबुली दिली आहे. या चोर्‍यांसह घरफोडीबाबत संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांच्या पथकाने आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहा.निरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी, विंचूरकर, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, महेंद्र कापुरे, प्रकाश सोनार, संदीप सरग, संतोष हिरे, मनोज पाटील, कुणाल पानपाटील, गौतम सपकाळ, राहुल सानप, चेतन कंखरे, उमेश पवार, रवी राठोड, सागर शिर्के, योगेश चव्हाण, कमलेश सूर्यवंशी, पंकज खैरमोडे, किशोर पाटील, योगेश जगताप, चालक संजय सुरसे, चालक कैलास महाजन यांच्या पथकाने केली.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !