धक्कादायक ! वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरीत 12 भाविकांचा मृत्यू


जम्मू : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी भाविकांची असंख्य गर्दी श्रध्दास्थान असलेल्या वैष्णोदेवी मंदिरात जमलेली असतानाच अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत 12 भाविकांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची भीती आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना मंदिराच्या गर्भगृहाबाहेर गेट नंबर तीनजवळ झाली. दरम्यान, लुधियानामधील एका भक्ताने सांगितले की, दर्शनासाठी एवढ्या पावत्या का फाडण्यात आल्या. प्रमाणापेक्षा जास्त पावत्या फाडल्या गेल्यामुळे गर्दी होऊन ही दुर्घटना झाली आहे.

वादानंतर झाली तुफान हाणामारी
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी वैष्णोदेवी मंदिरात भाविक मोठ्या संख्येने येत असतात. यानुसार यंदा कोरोनाचा प्रकोप असतांनाही हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. रात्री सुमारे दोन वाजता काही भाविकांमध्ये वाद झाला. याचे पर्यावसान हाणामारीत झाले. यामुळे हजारो भाविकांची पळापळ सुरू झाली. यात 12 जणांचा मृत्यू झाला असून 20 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे. दरम्यान, चेंगराचेंगरीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. तर आता मंदिर परीसरातून भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.





प्रशासनाचा गाफीलपणा भाविकांच्या जीवावर
दुर्घटनेवेळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींपैकी एकाने सांगितले की, माता वैष्णौदेवी भवन मार्गावर खूप गर्दी होती. ही गर्दी पाहूनच भीती निर्माण होत होती. लोकांनी सांगितले की, यामध्ये प्रशासनाची ही चूक आहे की, जेव्हा गर्दी होत होती तेव्हा लोकांना अडवले का गेले नाही. लोक चालत जात होते.
दरम्यान, दर्शनासाठी गेलेल्या गाझियाबादमधील एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, माता वैष्णौदेवी मंदिर परिसरात काही भाविक दर्शन घेतल्यानंतर तिथेच थांबले त्यामुळे तिथे गर्दी झाली. तसेच लोकांना बाहेर पडण्यासाठी जागा मिळेना. थोड्याशा जागेत लोक येत जात होते. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. दरम्यान, या घटनेनंतर प्रशासन तातडीने सक्रिय झाले तसेच घटनास्थळावर मदत आणि बचाव कार्य सुरू केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !