जळगाव जिल्हा खुनाने पुन्हा हादरला : पत्नीचा खून ; आरोपी पती जाळ्यात


धरणगाव : तालुक्यातील खर्दे येथे पत्नीने पतीला शिविगाळ केल्याने या रागातून पतीनेच पत्नीच्या डोक्यात लाकूड टाकून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. संशयीत आरोपी पतीला धरणगाव पोलिसांनी अटक केली असून पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. विठाबाई नामदेव जाधव (कुशेळावाडी, ता.मानगाव, जि.रायगड, हल्ली मुक्काम खर्दे, ता.धरणगाव) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

शिविगाळ केल्याच्या रागातून खून
विठाबाई जाधव ह्या पती नामदेव रामा जाधव यांच्यासह वास्तव्यस असून त्या खर्दे येथील विट भट्टीवर काम करून उदरनिर्वाह करीत होत्या. गुरुवार, 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास विठाबाई जाधव या घरी असताना पती नामदेव जाधव याने विट भट्टीसाठी कोळसा व गवत आण, असे सांगितले मात्र पत्नीने नशेत शिविगाळ केल्याचा आरोप असून त्याचा राग आल्याने रागाच्याभरात नामदेव जाधव याने जवळ पडलेला लाकडी दांडा उचलून विठाबाईच्या डोक्यात व चेहर्‍यावर मारल्याने त्यांचा मृत्यू झाला.

सर्पदंश झाल्याचा केला बनाव
विठाबाई यांना पतीने केलेल्या मारहाणीमुळे त्या अत्यवस्थ होताच नामदेव जाधव यांनी पत्नीला साप चावल्याचा बनाव करून रुग्णालयात दाखल केले होते. चेहर्‍यावरील घाव व मारहाण याचा प्राथमिक अंदाज पाहून पोलिसांनी संशय व्यक्त केला होता. याप्रकरणी नामदेव जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी संशयीत आरोपी नामदेव जाधव याच्या विरोधात धरणगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !