भीषण अपघातात चौघे मजूर ठार
नागपूर : भरधाव बोलेरो झाडावर आदळून झालेल्या अपघातात चार मजुरांचा मृत्यू झाला तर 7 मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे 3 च्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली असून ग्रामीण रुग्णालयात मृतकाच्या नातेवाईकांनी सकाळपासूनच गर्दी केली. काटोल तालुक्यातील इसापूर शिवारात हा अपघात झाला.
मजूरांना घेवून निघालेले वाहन धडकले झाडावर
मिळालेल्या माहितीनुसार मोहपा येथे बोलेरो पिकअप (एमएच 36 एफ 3163) संत्रा भरून मोहपा सावनेर मार्गावरून काटोल तालुक्यातील अंबाडा काटोल येथे परत येत होते. या वाहनात 10 मजूर व चालक असे 11 जण होते. दरम्यान इसापूर शिवारात हा अपघात झाला. या घटनेत, मनीषा कमलेश सलाम (38), मंजुषा प्रेमदास उईके (40), कलाताई गंगांधर परतेती (50), यांचा जागीच मृत्यू झाला तर मंजुळा वसंता धुर्वे (50म यांच्यावर नागपूर येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. जखमींमध्ये वृंदा अशोक दूधकवले (17), चैतानी स्लॅम (30), कलावंता संतोष पेंदाम (55), येनुबाई दूधकवळे (30), लक्ष्मीबाई तायडे (34) सर्व राहणार अंबाडा सोनक व विशाल बाँदे (35) मोहपा, आकाश बत्तासे मोहपा यांचा समावेश आहे. सर्व जखमींवर नागपूर येथे उपचार सुरू आहे.




