12 वर्षांपासून सासरच्यांनी विवाहितेला अमानुष छळले म्हणून खंडाळ्यातील विवाहितेने आत्महत्येला कवटाळले
पतीसह दीर व सासु-सासर्यांना भुसावळ तालुका पोलिसांनी केली होती अटक : विवाहितेवर चोपडा तालुक्यातील देवगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
भुसावळ : लग्नाच्या 12 वर्षानंतरही सासरच्या मंडळींकडून शोषण न थांबल्याने व जाच असह्य झाल्याने खंडाळा येथील सासर व चोपडा तालुक्यातील देवगाव येथील माहेर असलेल्या सुनीता विजय पाटील या 33 वर्षीय विवाहितेने सासरीच गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री नऊ वाजेपूर्वी घडली. पतीला नोकरी लावण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावेत तसेच अन्य किरकोळ कारणावरून सासरचे लोक छळ करीत असल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याची तक्रार मयत विवाहितेच्या भावाने दिल्याने पतीसह आठ आरोपींविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पतीसह, दीराणी व सासु-सासर्यांना पोलिसांनी अटक केली असून अन्य चौघे पसार झाले आहेत.
जाच असह्य : खंडाळ्यात विवाहितेची आत्महत्या ; पतीसह चौघांना अटक
अधिकार्यांची घटनास्थळी धाव
खंडाळा येथील विवाहितेने आत्महत्या केल्याची माहिती कळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, प्रभारी निरीक्षक प्रताप इंगळे, सहा.निरीक्षक प्रकाश वानखेडे यांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला.




12 वर्षांपासून विवाहितेचा छळ
मयत विवाहितेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2009 मध्ये देवगाव येथील युवराज पाटील यांची थोरली कन्या सुनीता पाटील हिचा खंडाळा येथील कालीपिली चालक विजय बाळू पाटील याच्याशी विवाह झाला होता मात्र लग्नानंतर नोकरीसाठी एक लाख आणावेत व अन्य कारणाने सासरचे लोक छळ करीत असल्याने सन 2010 व 2020 मध्ये भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. कौटुंबिक मतभेदामुळे न्यायालयात देखील दावा दाखल केल्यानंतर विवाहितेला सासरी पाठवण्यात आले मात्र सासरी होणार्या छळाला कंटाळून तीन वर्षांपासून विवाहिता माहेरीच होती तर न्यायालयाच्या निर्णयानंतर सप्टेंबर महिन्यातच ती सासरी आली व एका छोट्याशा खोलीत तिचे वास्तव्य होते. बारावी पास असलेल्या सुनीता यांना न्यायालयाच्या आदेशानंतर मोफत संगणकाचे शिक्षणही दिले जात होते.
नोकरी लागली मात्र छळ कायम
सुनीता यांच्या लग्नानंतर दिड वर्षात दिवस राहिले मात्र ‘आताच मुल नको’ म्हणून सासरच्यांनी अॅर्बाशन केले होते व त्यानंतर पुन्हा सुनीताचा छळ करण्यात आला. या काळात सुनीताचा पती विजय पाटील याला दुय्यम निबंधक कार्यालयात सिनियर क्लर्क म्हणून शासकीय नोकरी लागली मात्र तरीदेखील विवाहितेचा छळ थांबला नाही. दरम्यानच्या काळात दोघांच्या संसार वेलीवर प्रणय (6) व दर्शन (15) हे फुलही उमलले. आपल्यावर कर्ज झाल्याने ते लोक तगादा लावत असून माहेरून पैसे आणावेत, असा सासरच्यांनी आग्रह धरला मात्र माहेरची परीस्थिती नसल्याने पैसे देवू शकत नही, अशी भूमिका मांडल्यानंतर आणखीन जाच वाढला, असा आरोपही माहेरच्यांनी केला आहे.
सासरच्या लोकांसमोरच आत्महत्या : नातेवाईकांचा आरोप
सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास सुनीता विजय पाटील (33, रा.खंडाळा, ता.भुसावळ) यांनी राहत्या खोलीत आत्महत्या केली. याबाबत तालुका पोलिसांना तसेच माहेरच्यांना माहिती कळवल्यानंतर त्यांनी धाव घेत मोठा आक्रोश केला शिवाय संतापही व्यक्त केला. सासरच्या मंडळींसमोरच ही घटना घडल्याचा आरोप मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे.
क्रुरतेचा कळस : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार नंतर नराधमांनी केली क्रुरतेने हत्या
या आरोपींविरोधात दाखल झाला गुन्हा
मयत सुनीता हिला आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मयताचा भाऊ संदीप युवराज पाटील (30, देवगाव, ता.चोपडा, ह.मु.सातपूर, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार आरोपी पती विजय बाळू पाटील, सासु अंजनाबाई बाळू पाटील, सासरे बाळू उखर्डू पाटील, दीर भागवत बाळू पाटील, दिराणी रोहिणी भागवत पाटील (सर्व रा.खंडाळा, ता.भुसावळ), मोठी नणंद भारती विनोद पाटील (जळगाव), लहान नणंद प्रतिभा संजय पाटील, लहान नंदोई संजय भास्कर पाटील (रा.देवगाव, ता.चोपडा) यांच्याविरोधात गुरनं.001/2022, भादंवि 306, 498 अ, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपी पतीसह दीराणी, सासु व सासरे यांना अटक करण्यात आली तर अन्य आरोपी पसार झाले आहेत. तपास सहा.निरीक्षक प्रकाश वानखेडे करीत आहेत.
विवाहितेवर माहेरी अंत्यसंस्कार
मंगळवारी दुपारी पाच वाजता मयत विवाहिता सुनीता पाटील यांच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. धाकटा मुलगा प्रणय याने अग्निडाग दिला. मयत विवाहितेच्या पश्चात आई, वडील, बहिण, भाऊ असा परीवार आहे.