पादचार्याच्या हातातून आठ हजारांची रोकड लांबवली : एका संशयीताला अटक
जळगाव : शहरातील स्वातंत्र्य चौकातून पायी जाणार्या व्यक्तीच्या हातातून आठ हजार रुपये ठेवलेली पिशवी अज्ञात तीन जणांनी दुचाकीवरून लांबविली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर एका संशयीताला जळगाव जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे.
जिल्हा पेठ पोलिसात दाखल होता गुन्हा
शेख मेहबुब शेख फैयाज (रा.नशिराबाद, ता.जि.जळगाव) हे सोमवार, 3 जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास स्वातंत्र्य चौकातून पायी जात असतांना तीन अज्ञात चोरटे दुचाकीवर आले व त्यांनी शेख मेहबुब यांच्या हातातील आठ हजार रुपये ठेवलेली रकमेची पिशवी जबरी हिसकावून लांबविल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.




सीसीटीव्हीच्या आधारे संशयीत जाळ्यात
या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी सीसीटीव्हीच्या आधारे संशयीताला अटक करण्याच्या सूचना दिल्या. सहा.निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोहेकॉ महेंद्र पाटील, गणेश पाटील, सलीम तडवी, रविंद्र साळवे, विकास पहूरकर, समाधान पाटील, विनोद पाटील या पथकाने संशयीत आरोपी विशाल कैलास सैंदाणे (कांचन नगर, जळगाव) याला कांचन नगर परीसरातून बुधवार, 5 जानेवारी रोजी दुपारी अटक केली. आरोपीजवळून चोरी झालेल्या रकमेपैकी दोन हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली. आरोपीसोबत असलेल्या इतर दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
