टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार : चाळीसगावसह पुण्यातून दोघांना अटक
पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांनी नाशिक आणि चाळीसगावमधून दोघांना अटक केली आहे. नाशिकमधील आरोग्य विभागात कार्यरत असलेला टेक्निशिअन आणि जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील जिल्हा परीषद शाळेतील शिक्षकाचा संशयीतांमध्ये समावेश आहे.
शिक्षकांसाठी टीईटी म्हणजे केवळ शासनाला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी !
या संशयीतांना केली अटक
जळगाव, भडगावसह यावल व पारोळा तालुक्यातील काही एजंटाकरवी या गैरव्यवहाराला मोठी चालना देण्यात आली होती. चौकशीनंतर तपासाची दिशा त्यांच्यादिशेने असेल, हे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, जी.ए. सॉफ्टवेअरचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख याच्याबरोबर सुरंजित गुलाब पाटील (50, रा.उत्तरानगर, नाशिक), स्वप्निल तीरसिंग पाटील (रा.शिक्षक कॉलनी, चाळीसगाव, जळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना गुरुवारी न्यायालयाने 11 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.
शिक्षक पात्रता घोटाळ्यात सुपेंवर झालेल्या कारवाईने एजंट झाले सावध
दोन कोटी 35 लाख रुपये वेळोवेळी दिल्याचे कबूल
सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयात सांगितले की, स्वप्निल पाटील शिक्षक असून सुरंजित पाटील टेक्निशियन आहे. त्यांनी टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात अंकुश हरकळ व संतोष हरकळ यांच्यांशी संपर्क करून 2018-19 या परीक्षेसाठी बसलेल्या परीक्षार्थ्यांना पात्र करण्यासाठी कट रचला. सुरंजित पाटील याने 2019च्या परीक्षेसाठी 200 परीक्षार्थ्याकडून प्रत्येकी एक लाख 10 हजार रुपये घेऊन या परीक्षार्थ्यांची यादी व दोन कोटी 35 लाख रुपये अंकुश व संतोष हरकळ यांच्याकडे वेळोवेळी दिल्याचे कबूल केले आहे.
मोठा गैरव्यवहार आला होता उघडकीस
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून टीईटी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणाचा तपास पुणे सायबर पोलिस करीत आहेत. अटक केलेल्यांकडून तसेच तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे पुणे सायबर पोलिसांनी नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात अटकसत्र सुरू केले आहे. या गैरकारभारातील मुख्य आरोपींना तब्बल पावणे चार कोटी रुपये दिल्याचा आरोप केला जात आहे. नाशिक आणि चाळीसगावमधील दोघांनी तब्बल 350 हून अधिक परीक्षार्थींकडून पैसे घेतले. त्यांनी एकूण 3 कोटी 85 लाख रुपये एजंटांमार्फत मुख्य आरोपींना दिल्याचे पुणे पोलिसांच्या निदर्शनास येत आहे. याप्रकरणी पोलिस कसून तपास करीत आहेत. त्यामुळे या गैरव्यवहारातील अनेक बाबी दिवसेंदिवस उघडकीस येत आहेत.


