भुसावळ-ईगतपुरीदरम्यान धावली मेमू : रेल्वे प्रवाशांचा प्रतिसाद
पॅसेंजर थांबे रद्द झाल्याने प्रवाशांची नाराजी : मेल एक्स्प्रेसच्या भाड्यामुळे प्रवाशांना भूर्दंड
भुसावळ : तब्बल 22 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर भुसावळ-ईगतपुरी दरम्यान, मेमू गाडी (Memu Train) सोमवार, 10 जानेवारी रेल्वे प्रवाशांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर धावली. प्रमुख थांब्यावर मेमूचे (Memu) प्रवाशांनी स्वागत केले तर तब्बल सात थांबे रद्द करण्यात आले शिवाय वाढीव मेल एक्स्प्रेसचे भाडे आकारण्यात आल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
देवळाली शटलऐवजी धावणार आता मेमू
कोरोनाच्या काळात 22 मार्च 2020 रोजी देवळाली शटल बंद करण्यात आली. प्रवाशांच्या रेट्यानंतर व झालेल्या पाठपुराव्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून नुकतेच नोटिफीकेशन काढण्यात आले होते मात्र भुसावळ-देवळाली पॅसेंजरऐवजी 10 जानेवारीपासून भुसावळ-ईगतपुरी मेमू (Bhusawal-Igatpuri Memu) चालवण्याचा रेल्वे प्रशासनाने घेतला होता.




असे आहे मेमूचे वेळापत्रक
भुसावळ- ईगतपुरी मेमू (Bhusawal-Igatpuri Memu) गाडी ही भुसावळ जंक्शनवरून सकाळी सातला सुटल्यानंतर ईगतपुरीला दुपारी तीन वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी ईगतपुरी (Igatpuri) येथून सकाळी 9.15 वाजता सुटून भुसावळ जंक्शनवर सायंकाळी 5.10 वाजता पोचेल. ही गाडी आठ डब्यांची असून मेल, एक्सप्रेस गाडीचे दर आकारले जाणार आहे. ही गाडी लहान स्थानकांवर केवळ एका मिनिटासाठी थांबेल.
पॅसेंजरचे हे थांबे रद्द
भुसावळ-देवळाली शटल सर्व थांब्यावर थांबत होती. त्यातील सात स्थानकांवर मेमू गाडी (Memu) थांबणार नाही. यात वाघळी, पिंपरखेड, हिस्वल, समीट, पीजन, ओढा, लहाविट या स्थानकांवर ही गाडी थांबणार नाही.