भुसावळातील स्टेशन रस्त्याचा लोकप्रतिनिधी व नागरीकांच्या प्रयत्नामुळे सुटला तिढा
भुसावळ : भुसावळातील स्टेशन रस्त्याचा डांबरीकरणाचा प्रश्न सुटल्याने भुसावळातील वाहनधारकांसह रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील जागृक नागरीक, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, खासदार व आमदारांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या रस्त्याचे काम होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. गुरुवार, 20 जानेवारीपर्यंत या मार्गाचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने संबंधिताना दिले आहे.
खासदारांसह आमदारांचा पाठपुरावा मोलाचा
स्टेशन रस्त्याचा तिढा सुटण्यासंदर्भात खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांनी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता शिवाय त्या संदर्भात स्वतंत्र बैठक लावून त्यातदेखील स्टेशन रस्त्याच्या दुरवस्थेमुळे होणारे हाल रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. 27 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या मॅरेथॉन बैठकीतही दोघा लोकप्रतिनिधींनी रस्त्याचे काम करण्यासंदर्भात आक्रमक भूमिका मांडली होती.
लोकप्रतिनिधी व नागरीकांचाही पाठपुरावा
भुसावळचे नगरसेवक निर्मल कोठारी, भुसावळ परीवर्तन मंचचे प्रा.जयेंद्र लेकुरवाळे, व्यापारी विनोद जैन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक, आरोग्य सभापती प्रा.दिनेश राठी यांनीही रेल्वे प्रशासनाकडे रस्त्याची समस्या मांडली होती. या तक्रारदारांना रेल्वे विभागाने लेखी स्वरुपात माहिती देत 20 जानेवारीपर्यंत काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे. दरम्यान, खडीकरण पूर्ण झाले असून क्युरिंगनंतर सिलकोट व कारपेटची कामे केली जाणार आहेत.
कुणा एकट्याचे हे यश नाही : आमदार
रेल्वे स्टेशन रस्त्याची दुरुस्ती होण्यासंदर्भात खासदार रक्षा खडसे व आपण स्वतः रेल्वे प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला आहे शिवाय त्या संदर्भात बैठकही लावण्यात आली होती. स्थानिक नागरीक व लोकप्रतिनिधींनीही याबाबत तक्रारी केल्या त्यामुळे कुणा एकट्याच्या पाठपुराव्याचे यश नसल्याचे आमदार संजय सावकारे यांनी म्हटले आहे.


