जळगावात विवाहितेची आत्महत्या : पतीसह पाच संशयीतांविरोधात गुन्हा


जळगाव : शिरसोली येथील 22 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्यानंतर या प्रकाराला कारणीभूत ठरल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरोधात एमआयडीसी

पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.





पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा
बुधवारी पहाटे पाच वाजता प्राजक्ता उर्फ कोमल अजय बारी (बुंधे, 22, रा. शिरसोली) या विवाहितेने आत्म्हत्या केली होती. विशेष म्हणजे 11 महिन्यांपूर्वीच तरुणीचा विवाह झाला होता. विवाहितेला आत्महत्येस प्रृवत्त केल्याप्रकरणी मृत प्राजक्ताईची आई मालती नंदलाल बारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, विवाहितेचा पती अजय अशोक बुंधे, सासरा अशोक दगडू बुंधे, सासू शोभाबाई, जेठ विजय बुंधे व नणंद वैशाली अशोक काळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

छळ असह्य झाल्याने उचलले टोकाचे पाऊल
22 फेब्रुवारी 2021 रोजी प्राजक्ताचे लग्न अजय बुंधे याच्याशी झाले. लग्नात पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व दीड तोळ्याची गळ्यातील सोनसाखळी दिली होती. लग्नानंतर अजयच्या आजीचे निधन झाल्याने प्राजक्ता शेंदुर्णी (ता. जामनेर) येथे माहेरी आली होती. या वेळी तिने आईजवळ काही बाबी सांगितल्या होत्या. लग्नात जास्त हुंडा न दिल्याने सासरचे लोक सतत टोचून बोलतात. छळ करतात. असे तिने आईला सांगितले होते. दरम्यान, या वेळी सासरचे लोक तिला घेण्यासाठी आलेच नाही. दोन महिन्यांनतर समजूत काढल्यानंतर आईने पुन्हा प्राजक्ताला सासरी सोडले. यानंतर काही दिवस ती पती, सासू, सासर्‍यांसह हैदराबाद येथे राहण्यासाठी गेली होती. तेथून परत आल्यानंतर पुन्हा एकदा सासरच्या लोकांनी तिच्याकडे 2 लाख रुपयांसाठी तगादा लावला तसेच छळ सुरू केला. यानंतर पुन्हा दोन महिन्यांसाठी प्राजक्ताला माहेरी सोडून दिले होते. दरम्यान, 23 डिसेंबर रोजी सासरचे लोक तिला सासरी घेऊन आले. यानंतर त्यांनी प्राजक्ताला तिच्या आईशी संपर्कच करू दिला नाही. मंगळवारी मध्यरात्री प्राजक्ताने घराच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी पहाटे पाच वाजता हा प्रकार पती अजयच्या लक्षात आला. यानंतर त्यांनी प्राजक्ताच्या आईला घटनेची माहिती दिली. प्राजक्ताच्या अंगावरचे दागिने काढून घेतल्याचेही दिसून आले. सासरच्या छळास कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला.

आई-वडिलांची एकुलती, पितृछत्र लहानपणी हरपले
प्राजक्ताला भाऊ-बहिण कुणीही नाही. आई-वडिलांची ती एकुलती एक मुलगी होती. ती लहान असतानाच तिच्या वडिलांचेही निधन झाले आहे. आईने तिचे पालन-पोषण करून अखेर लग्न लावून दिले होते; परंतु लग्नानंतरही तिच्या आयुष्यात अडचणींचे दिवस आले. छळ झाला. यातच तिने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !