धाडसाला सलाम ! : जळगावच्या शिवांगी काळेला “प्रधानमंत्री बाल शक्ती पुरस्कार”
जळगावात गतवर्षी वाचवले होते आई व बहिणीचे प्राण
जळगाव : कोल्हे नगरात राहणार्या विवाहितेने हिटरचे बटन बंद न करता बादलीला हात लावल्याने विजेचा धक्का बसल्याने विवाहितेच्या पाच वर्षाच्या मुलीने प्रसंगावधानाने लहान बहिणीला दूर नेत हिटरचे बटन बंद करून आपल्या आईचे व बहिणीचे प्राण वाचविले होते. जळगाव शहरात गतवर्षी 5 जानेवारी 2021 रोजी ही घटना घडली होती. दरम्यान, आईसह बहिणीचे प्राण वाचवून प्रसंगावधान राखणार्या जळगाव येथील सहा वर्षीय शिवांगी काळे (shivangi kale) या चिमुकलीला वीरता श्रेणीत सोमवार, 24 जानेवारी रोजी प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले.
ऑनलाईन झाला गौरव
सोमवारी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते देशातील बाल शौर्य विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. कोरोनाच्या आपत्तीमुळे हा कार्यक्रम ऑनलाईन या प्रकारात घेण्यात आला. यात जळगाव येथील शिवांगी काळे (shivangi kale) या साडेसहा वर्षाच्या बालिकेचा समावेश आहे.





अशी घडली होती घटना
एमआयडीसीतील एका कंपनीत अधिकारी असलेले प्रसाद काळे हे कोल्हे नगरात पत्नी गुलबक्षी (33), मुलगी शिवांगी (6) (shivangi kale) आणि इशान्वी (4) यांच्यासह वास्तव्यास असून गतवर्षी 5 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता ते ड्यूटीवर गेल्यावर घरी पत्नी दोन्ही मुली असे तिघंच होते. दोघं मुलींची आंघोळ घालण्यासाठी गुलबाक्षी यांनी स्टीलच्या बादलीत हिटर टाकून पाणी गरम केले. मात्र मुलींनी आंघोळ करण्यास नकार देऊन नंतर करू असे सांगून बाहेर खेळण्यासाठी गेल्या. दोन्ही मुली बाहेर खेळण्यासाठी गेल्याने केव्हाही घरात येऊ शकतात धोका नको म्हणून त्यांनी बटन बंद करून पाणी थंड केले. त्यानंतर गुलबाक्षी यांनी स्वत : च्या आंघोळीसाठी पाणी गरम केले परंतु पाणी घेतांना हिटरचे बटन बंद न करता बादलीत हात टाकला असता त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. त्यात त्यांचा आवाज झाल्याने बाहेर खेळत असलेल्या दोन्ही मुली घरात आल्या. यावेळी मोठी मुलगी शिवांगी हिने प्रसंगावधान ओळखून तातडीने बहिणीला आईपासून लांब केले व प्लॅस्टीक स्टूलवर उभे राहून बटन बंद करून बादलीतील वीजप्रवाह बंद केला. थोडा उशीर झाला असता तर कदाचित आई गुलबाक्षी व बहिण इशान्वी यांच्या बाबतीत दुर्घटना घडली असती.
शौर्याची घेतली दखल
आईसह बहिणीचे प्राण वाचवणार्या शिवांगी काळेला (shivangi kale) सोमवारी प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. सोमवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह शिवांगी आणि तिच्या पालकांनी पंतप्रधानांशी (PM Narendra Modi) संवाद साधला. या कार्यक्रमात तिला गौरविण्यात आले. या माध्यमातून जिल्ह्याचा नावलौकीक उंचावला आहे.
