धरणगावातील लाचखोर गटशिक्षणाधिकार्यांसह दोघांची पोलिस कोठडीत रवानगी
जळगाव : शाळेसाठी अनुदान मंजूर होण्यासाठी अनुकूल अहवाल देण्यासाठी दोन हजारांची लाच मागून ती गटशिक्षणाधिकारी कार्यालयातच स्वीकारताना धरणगाव गटशिक्षण अधिकार्यांसह समावेशीत शिक्षण तज्ज्ञास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याची घटना सोमवारी दुपारी धरणगावात घडली होती. लाच प्रकरणी गटशिक्षणाधिकारी अशोक दामु बिर्हाडे (57, रा.राधाकृष्ण नगर, पिंपळे रोड, अमळनेर) व समावेशीत शिक्षण तज्ज्ञ तुळशिराम भगवान सैंदाणे (34, रा.बोरोले नगर, पंडीत कॉलनी, चोपडा) यांना अटक करण्यात आल्यानंतर मंगळवारी त्यांना जळगाव न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
कार्यालयातच स्वीकारली होती लाच
धरणगाव तालुक्यातील पाळखी खुर्द गावातील 45 वर्षीय तक्रारदाराची पाळखी खुर्दला पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. ही शाळा 2016 पासून आजपावेतो ते स्वयं अर्थ सहाय्यता या तत्वावर चालवित आहेत. शासनाच्या राईट टू एज्युकेशन योजनेप्रमाणे 25 टक्के विद्यार्थी शाळेत भरावयाचे असतात. त्यासाठी शासन प्रत्येक विद्यार्थामागे आठ हजार रुपये वार्षिक अनुदान मंजूर करते. या शाळेतील 2020-21 या शैक्षणिक वर्षात आरटीई या योजनेंतर्गत शाळेत 17 विद्यार्थ्यांनी प्रवेश केला आहे. आठ हजार रुपयांप्रमाणे 17 विद्यार्थ्यांचे एक लाख 36 हजार रुपये प्रतिपूर्ती अनुदानाची रक्कम झालेली असून सदर अनुदान मंजूर होण्यासाठीचा अनुकूल अहवाल तयार करून जिल्हा परीदेला देण्यासाठी आरोपी अशोक बिर्हाडे यांनी 30 डिसेंबर 2021 रोजी लाच मागितली होती व सोमवार, 24 जानेवारी रोजी सायंकाळी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात समावेशीत शिक्षण तज्ज्ञ तुळशिराम सैंदाणे यांनी ती बिर्हाडे यांच्या सांगण्यानुसार स्वीकारल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, आरोपींना जळगाव न्यायालयाने मंगळवारी एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. तपास जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकारी करीत आहेत.





