पाचोरा तरुणाच्या खुनाने हादरले : पाच संशयीत ताब्यात
पाचोरा : शहरात 23 वर्षीय तरुणाची क्षुल्लक कारणावरून हत्या करण्यात आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. तरूणाच्या खून प्रकरणी टोळक्यातील पाच जणांना अटक करण्यात आली असून तिघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. भूषण नाना शेवरे (23, रा. दुर्गा नगर, पाचोरा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
खुनाने शहर हादरले
या संदर्भातील माहिती अशी की, रविवार, 30 रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान शहराच्या पुनगाव रोड रस्त्यावरील बुरहानी इंग्लिश मेडियम स्कूलच्या आवारात तरुणांच्या झालेल्या भानगडीत एका 23 वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने भोसकुन खून करण्यात आला. या घटनेत मोटारसायकलचा कट लागण्याच्या वादातून भूषण शेवरे याच्यावर तरूणांच्या एका टोळक्याने हल्ला चढविल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून लोकेश उर्फ विकी शामराव शिंदे, मयूर दिलीप पाटील, राकेश उर्फ सचिन राजेंद्र चौधरी, राहूल उर्फ मॉडी पाटील, चेतन उर्फ स्टायलेश पाटील, सागर प्रकाश पाटील, अविनाश उर्फ भद्रा सुरेश पाटील आणि पवन पाटील (पूर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात गुरनं 42/2022 भादंवि कलम 302, 143, 147, 148, 149, 323, 324, 504, 114 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





या संशयीतांना घेतले ताब्यात
लोकेश उर्फ विकी शामराव शिंदे, मयूर दिलीप पाटील, राकेश उर्फ सचिन राजेंद्र चौधरी, सागर प्रकाश पाटील आणि अविनाश उर्फ भद्रा सुरेश पाटील या संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील तीन फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलि निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
