लाखो रुपये किंमतीच्या पशूधनावर चोरट्यांचा डल्ला


महिंदळे, ता.भडगाव : येथून जवळच असलेल्या पळासखेडे (रुपनगर) येथील रमेश चेनु वंजारी यांच्या घरासमोरून बैल जोडी, दोन दुभत्या गाई, व चार वासरे अशी एकूण आठ गुरे बुधवारी रात्री चोरट्यांनी लांबवली. सकाळी पाच वाजता दूध धुण्यासाठी गुरे बघितली असता गुरे जागेवर दिसली नाहीत. या प्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनमध्ये अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

कुटुंबाला रडू कोसळले.
रमेश वंजारी हे अतिशय गरीब शेतकरी आपल्या कुटुंबासोबत पळासखेडे रुपनगर येथे वास्तव्य करून राहतात. दिवसभर शेतीकाम करून संध्याकाळी जेवणानंतर रात्री दहा वाजता शेवटचे वैरण गुरांना टाकून थंडीमुळे कुटुंब घरात झोपले. मात्र सकाळी कुटुंब उठल्यावर घरासमोर गुरे दिसली नाहीत. यावेळी मात्र कुटुंबाला मात्र रडूच कोसळले. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी कर्ज काढून गुरे घेतली. त्यात शेतीसाठी त्यांच्या कडे एकच बैल होता. त्यामुळे त्यांनी गावातील परमेश्वर विक्रम पाटील याचा एक बैल कामासाठी वापरायला घेतला. परंतु तोही बैल चोरटयांनी लांबवला.






चोरट्यांची हिंमत वाढली
महिंदळे रस्त्यावर रमेश वंजारी यांचे घर आहे. घरासमोर मराठी शाळेच्या संरक्षक भिंतीला लागून सर्व गुरे ते गेल्या अनेक वर्षपासून बांधतात. वर्दळीचा रस्ता असून चोरटयांनी गुरे चोरली त्यामुळे परीसरातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत चोरटे शेतातील गुरे चोरत होती. आता मात्र घराजवळून गुरे चोरण्याची हिम्मत त्यांनी केली. परीसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट अनेक दिवसांपासून सुरू आहे. यात शेतकर्‍यांचे विहिरीतील पंप, केबल वायर, शेतातील शेतीउपयोगी वस्तू, शेतातील पिक, घर फोडी अशा चोर्‍या परिसरात होत राहतात. त्यामुळे भडगाव पोलीस स्टेशन मार्फत रात्रीची गस्त सुरू करावी, अशी मागणी गावकर्‍यांनी केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !