चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई : सहा लाखांचा ऐवजांसह चौघे जाळ्यात
चाळीसगाव : सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असे सहा लाख रुपये अज्ञाताने लंपास केल्याची घटना चाळीसगावात घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी सात दिवसांतच तपासाचा छडा लावून चार आरोपींना अटक केली. संशयीतांकडून सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ग्रामीण पोलिसात दाखल होता गुन्हा
अहमदनगर जिल्ह्यातील पोलिस क्वार्टर येथील अंकीता प्रतीक पाटील (25) हे आपल्या आई बरोबर 27 जानेवारी रोजी लग्नाच्या निमित्ताने मालेगावहून चाळीसगावात आल्या. दरम्यान शहरातील एका पॅजोरीक्षात बसून हिरापूर जात असताना कपड्यांच्या बॅगेत ठेवलेले सोन्याच्या दागिने अज्ञाताने लंपास केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अंकीता प्रतीक पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसात 28 जानेवारी रोजी भादवी कलम-379 प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले होते. याचे तपास पोना नितीन आमोदकर हे करीत होते.





गोपनीय माहितीवरून कारवाई
दरम्यान गुरुवार, 3 फेब्रुवारी रोजी ग्रामीण पोलीसांना गुप्तहेरांकडून माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी सापळा रचून आरोपी नामे अजय अंबादास घुमडकर (23, रा.बस स्थानकामागे, चाळीसगाव), रवींद्र मल्लु घुमडकर (23, टाकळी प्र.चा, चाळीसगाव), विकी बाबू घुमडकर (24, रा.खरजाई, रेल्वे गेट, चाळीसगाव) व नितेश शिवाजी पंच (21, रा.पंचवटी, नाशिक) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 27 हजार 500 रूपये रोकड व 5 लाख 84 हजार 700 रूपये किंमतीचे 13 तोळ्याची सोन्याची लगड असे एकूण 6 लाख 12 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. चारही आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक रमेश चव्हाण, सहा.निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार, युवराज बंडू नाईक, नितीन किसन आमोदकर, गोवर्धन राजेंद्र बोरसे, शांताराम सिताराम पवार, भूपेश वंजारी, प्रेमसिंग राठोड यांच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार नितीन आमोदकर व शांताराम पवार करीत आहेत.
