अवघ्या 50 रुपयांसाठी पुतण्याने घेतला काकांचा बळी : कंडारीतील घटना
धरणगाव : अवघ्या 50 रुपयांसाठी पुतण्याने काकांचा बळी घेतल्याची घटना तालुक्यातील कंडारी येथे सोमवार, 7 रोजी रात्री घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात पुतण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत सुकडू भील (44) असे मयताचे नाव आसून राजू मानसिंग भील (28) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
50 रुपयांसाठी घेतला बळी
धरणगाव तालुक्यातील कंडारी येथे राजू मानसिंग भील (वय 28) आणि भारत सुकडू भील (वय 44) या पुतण्या व काकांमध्ये 50 रुपयांच्या उधारीवरून सोमवार, 7 फेब्रुवारी रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास शाब्दिक वाद वाढल्यानंतर तो हाणामारीपर्यंत पोहोचला. संशयीत राजुने आपले काका भारत यांना जोराचा धक्का दिल्याने ते गटारीत जाऊन पडले. गटारीत पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार बसून मोठा रक्तस्त्राव झाला. यानंतर भेदरलेल्या पुतण्या राजूने त्यांना लागलीच नातेवाईकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले परंतु वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणीअंती भारत भील यांना मृत घोषित केले. यासंदर्भात पुतण्या राजू भिल याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ हे करीत आहे.





