सज्ञान महिलेशी सहमतीने शरीरसंबंध म्हणजे बलात्कार ठरत नाही : सत्र न्यायालयाचा निकाल


नागपूर : बलात्काराच्या एका गुन्ह्यात सत्र न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला आहे. सज्ञान महिला एखाद्या पुरूषाशी सहमतीने शरीरसंबंध ठेवत असल्यास अशावेळी संबंधित पुरुषाला बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी धरता येणार नाही, असा निर्णय सत्र न्यायालयाचे न्या.सुनील पाटील यांनी दिला आहे.

बलात्कार प्रकरणी दाखल होता गुन्हा
संशयीत आरोपी सागर चुन्नीलाल दडुरे हे महादुला येथील रहिवासी असून सागर हे एका खाजगी कार्यालयात नोकरी करतात. सागर शिक्षण घेत असताना त्यांची एका मुलीशी ओळख झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. त्यांनी एकमेकांच्या सहमतीने शरीरसंबंध ठेवले. सागरचा आणि संबंधित महिलेचा लग्न करण्याचा विचार होता पण सागरच्या घरच्यांनी लग्नाला विरोध केला त्यामुळे लग्न करू शकले नाही. सागरच्या आई-वडिलांना ती मुलगी सून म्हणून नको होती. मुलाकडून लग्नास विरोध झाल्यानं संबंधित महिलेने अत्याचाराची तक्रार नोंदविली. सागरने माझ्यावर बलात्कार केला. माझी फसवणूक केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.

न्यायालय म्हणाले तर हा बलात्कार ठरत नाही
दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली. न्यायालयात संशयीत सागरचे वकील अ‍ॅड.आर.के.तिवारी यांनी सांगितले की, संबंधित महिलेने सहमतीने शरीरसंबंध ठेवले. सागरने काही जबरदस्ती केली नव्हती. सागरचा फसवणूक करण्याचा कोणताही उद्देश नव्हता. तिला लग्नाचे कोणतेही आमिष दिलेले नव्हते. हा दावा सिद्ध झाला. त्यामुळं न्यायालयाने सागरची निर्दोष सुटका केली. एखाद्या सज्ञान महिलेशी शरीरसंबंध म्हणजे बलात्कार नव्हे, असा निर्णय न्यायालयाने दिला. आधी सहमतीने संबंध ठेवायचे आणि नंतर बलात्काराची तक्रार करायची हे योग्य नव्हे, असे न्यायालयानं म्हणत संशयीताची निर्दोष सुटका केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !