भरधाव पिकअपच्या धडकेत दोघे तरुण ठार
दिंडोरी : वणी शिवारातील बोरीचापाडा येथील बालाजी नर्सरीसमोर टोमॅटो भरून वणीकडे भरधाव वेगाने येणारी पिकअपने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघे तरुण ठार झाले. सागर धनराज बागुल (22) व राहुल नामदेव चहाळे (18, दोघे रा.भातोडे, ता. दिंडोरी) अशी मयतांची नावे आहेत.
रस्त्यावर विखुरले टमाटे
दोघे तरुण दुचाकी (एम.एच 17 बीडी 5818) ने जात असताना टमाट्यांची वाहतूक करणार्या टेम्पोने धडक दिली. पिकअपची धडक इतकी भयानक होती की मोटारसायकल व दोघाही तरुणांचा चेंदामेंदा झाला. धडक दिल्यानंतर पिकअपही रस्त्याच्या मधोमध पलटी होऊन पिकअपमधील टोमॅटो रस्त्यावर सर्वत्र पसरून टोमॅटोंचा रस्त्यावर चिखल झाला. घटनेनंतर स्थानिक व पोलिसांनी धाव घेत छिन्नविच्छिन्न मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले.

अपघातानंतर जमाव संतप्त
घटनेची खबर भातोडे येथे कळताच ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत पिकअप चालकास त्वरित अटक करण्याची मागणी केली. यावेळी पोलिसांनी व वणीतील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांची समज काढून वातावरण शांत केले. दरम्यान, रात्री उशिरा पिकअप चालकावर वणी पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मयत तरुण दोघेही शेतमजूर व घरातील कर्ते होते.
