शेततळ्यात बुडून तीन मित्रांचा दुर्दैवी अंत
दौलताबाद : तीन मित्रांचा शेततळ्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना भांगसीमाता गडाच्या पायथ्याशी असलेल्या शेकापूर शिवारातील शेततळ्यात घडली. या दुर्दैवी घटनेत प्रतीक आनंद भिसे (15), तिरुपती मारोती इंदलकर (15), शिवराज संजय पवार (17) या मित्रांचा अंत झाला. यापैकी प्रतीक व तिरुपती हे दोघे तनवाणी शाळेत शिकत होते, तर शिवराज अकरावीचे शिक्षण घेत होता.
सुटी असल्याने पर्यटनासाठी आल्यानंतर दुर्घटना
सहारा संगम, बजाजनगर या परिसरात राहणारे हे तिघे मित्र रविवारी सुटी असल्याने दुपारी सायकल घेऊन फिरायला गेले होते. मात्र सायंकाळ झाली तरी घरी आले नाहीत म्हणून कुटुंबीयांनी शोधाशोध केली. दुसर्या दिवशी सोमवारी रोजी सकाळी शरणापुर-धर्मपुर गावाच्या परीसरातील भांगसीमाता गडाच्या पायथ्याशी असलेल्या शेकापुरी शिवारातील शेततळ्याच्या भिंतीवर काही चपला, कपडे व कमरेचा बेल्ट आढळून आले.

अखेर तिघांचे मृतदेह सापडले
परीसरात बकर्या चारणार्या लोकांनी ही माहिती धर्मपूरचे पोलिस पाटील हरिदास कचरू मोरे यांना दिली. त्यांनी दौलताबाद पोलिसांना कळवले. शेततळ्यापासून काही अंतरावर दोन सायकली देखील उभ्या होत्या. अग्निशमन विभागाच्या जवानांनी शेततळ्यात सुमारे 27 फूट खोलवर जाऊन शोध घेतला असता या तिघांचे मृतदेह सापडले.
