शरद पवारांच्या घरावर हल्ला करणार्यांवर कठोर कारवाई करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : शरद पवार यांच्या घरावर झालेला हा हल्ला निंदनीय असल्याचे मुख्यमंत्र्यानी म्हटले असून हल्लेखोरांवर कठोर कारवाईचे आदेश त्यांनी पोलिस अधिकार्यांना दिले आहेत.
राज्य शासनाच्या निर्णयाची न्यायालयात दिली होती माहिती
एसटी कर्मचार्यांच्या हितासाठी राज्य सराकार सर्व प्रयत्न करत आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचार्यांसाठी कोणते निर्णय घेतले आहेत, याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली आहे. न्यायालय देखील या सर्व प्रकरणी लक्ष ठेवून आहे. शिवाय यासंदर्भातील निर्णयही न्यायालयाने दिला असून आंदोलनकर्त्या कर्मचार्यांना कामावर परतण्यास सांगितले आहे. कर्मचार्यांनी देखील न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले होते


हिंसक जमावावर कारवाईचे आदेश
शुक्रवारी दुपारी अचानक शरद पवार यांच्या निवासस्थानी एका जमावाने घोषणाबाजी करत दगडफेक आणि चप्पलफेक केली. अशी कृत्ये निंदनीय असून कोणालाही न पटणारी आहेत. अशा प्रकारे हिंसेला उद्युक्त किंवा प्रक्षोभ निर्माण करणार्यांवर तसेच चिथावणी देणार्यांवर कायद्याने कडक कारवाई झाली पाहिजे, अशा सूचना गृहमंत्र्यांना दिल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
हा पायंडा महाराष्ट्राने पाडलेला नाही
मुख्यमंत्री म्हणाले, नेत्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या घरांवर हल्ले करणे हा पायंडा महाराष्ट्राने कधीही पाडलेला नाही. एसटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसंदर्भात आंदोलन करत असले तरी राज्य शासनाने कधीही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले नाही. महामंडळाचा कर्मचारी आमचाच आहे, या भावनेतून जास्तीत जास्त आर्थिक आणि सेवाविषयक लाभ देता येतील ते आम्ही दिले आहेत.
कुणीही भाजू नयेत पोळ्या : मुख्यमंत्री
आज घडलेल्या घटनेला प्रत्युत्तर देण्यासाठी कोणीही कायदा आणि सुव्यवस्थेला धोका पोहचेल असे कृत्य करू नये. एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भल्यासाठी नेहमीच शासन त्यांच्याबरोबर राहील. परंतु, या कर्मचार्यांच्या संसाराच्या राखेवर कोणी आपल्या पोळ्या भाजू नयेत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.
