महाराष्ट्रातील दारु तस्करीचे गुजरात कनेक्शन : विसरवाडी पोलिसांच्या कारवाईत 13 लाखांची दारू जप्त

बनावट नंबरप्लेट लावून आरोपींकडून सुरू होती दारूची वाहतूक : दारू तस्करी पुन्हा ऐरणीवर


गणेश वाघ
भुसावळ (7 मे 2026) : गुजरात राज्यात दारू प्रतिबंधीत असली तरी खाजगी वाहनासह रेल्वेद्वारे तिची मोठ्या प्रमाणावर तस्करी नवीन नाही. पोलिसांकडून कारवाई सातत्याने होत असतानाही आरोपी दरवेळी पुष्पा स्टाईल शक्कल लढवून दारूची वाहतूक करतात मात्र विसरवाडी पोलिसांना यावेळी पक्की अवैध दारू वाहतुकीची टीप मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून 13 लाखांचा मद्यसाठा जप्त केला. विशेष म्हणजे आरोपींनी वाहनाला बनावट क्रमांक लावून दारू तस्करीचा प्रयत्न केला मात्र सतर्क पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांना पाहताच रतीलाल संजयभाई गामीतसह तिघे पसार झाले.

गोपनीय माहितीद्वारे अवैध दारुची तस्करी थांबली
विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी जयेश खलाणे यांना खांडबारा ते शही रोडदरम्यान खांडबारा गावाकडून एक पांढर्‍या रंगाची क्रेटा वाहनात देशी दारु व बिअर बॉटल विनापास, परमिटशिवाय गुजरात राज्यात चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने नेत असल्याची माहिती मिळाली. बुधवार, 6 रेाजी एपीआय जयेश खलाणे यांनी पथकासह सापळा रचला.



बनावट नंबरप्लेटद्वारे वाहतूक
एका शेतासमोर रस्त्याच्या बाजुला सापळा पोलिसांनी रचल्यानंतर पांढर्‍या रंगाचे क्रेटा वाहन येतांना दिसल्यानंतर पोलिसांनी थांबण्याचा इशारा केल्यानतर चालकाने वाहन थोड्या अंतरावर थांबवले व चालकासोबतच्या दोघांनी शेतातुन पळ काढला. पथकाने तपासणी केल्यानंतर वाहनाची नंबर प्लेट वरील क्रमांक हा बनावट असल्याचे निष्पन्न झाले तसेच वाहनाचे चेसिस क्रमांकावरुन वाहनाचे मालकाची माहिती घेण्यात आली.

वाहनाची पथकाने तपासणी केले असता त्यामध्ये एकूण 13 लाख सहा हजार 60
रुपये किंमतीची देशी दारू, बिअर व वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्यानंतर तीन्ही आरोपींविराधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जयेश खलाणे यांच्यानेतृत्वात हवालदार राजु कोकणी, कॉन्स्टेबल सागर चौधरी, शाम पेंढारे, लिनेश पाडवी, प्रकार अहिरे, दिनेश पावरा आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !