जळगाव जिल्हाधिकार्यांचे आदेश : भुसावळ नगराध्यक्षपदाचा पदभार उपनगराध्यक्षांकडे सोपवा
Jalgaon District Collector’s Order: Hand Over Charge of Bhusawal Municipal Council President to the Vice-President भुसावळ (7 मे 2026) : जातप्रमाणपत्र वैध नसल्याने भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री गौर यांना जातपडताळणी समितीने अपात्र ठरल्यानंतर राज्य शासनाच्या नगरविकास विभागानेही निवड पूर्वलक्षी प्रभावाने अवैध ठरवली होती. भुसावळातील राजकीय स्थित्यंतरानंतर मोठ्या राजकीय घडामोडी सुरू असतानाच जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नगराध्यक्षांना आपल्याकडील पदभार, कागदपत्रे तातडीने उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांच्याकडे सोपवण्याचे निर्देश दिले आहेत. बहुमतात असलेल्या भाजपाला आता लवकरच पदभार मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पदभार हस्तांतरणाचे जिल्हाधिकार्यांचे आदेश
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायत व औद्योगिक नगरे अधिनियम 1965 च्या कलम 57(2) नुसार, नगराध्यक्ष पद रिक्त झाल्यास किंवा अपात्र ठरल्यास तात्काळ पदभार उपनगराध्यक्षांकडे देणे बंधनकारक आहे मात्र आदेशानंतरही पदभार हस्तांतरित न झाल्याने उपनगराध्यक्षा शैलजा पुरुषोत्तम नारखेडे यांनी मंगळवार, 5 मे रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन देत पदभार अद्याप सोपवला नसल्याचे नमूद केले होते. त्यानंतर जिल्हाधिकार्यांनी कलम 57 (4) अंतर्गत हस्तक्षेप करत तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.


असा आहे जिल्हाधिकार्यांचा आदेश
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिलेल्या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, नगराध्यक्ष पदाशी संबंधित सर्व प्रशासकीय कागदपत्रे, अभिलेखे, अधिकृत नोंदी तसेच नगरपरिषदेची मालमत्ता तत्काळ उपनगराध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात यावी.
कायदेशीर कारवाईचा इशारा
आदेशाचे पालन न केल्यास महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायत व औद्योगिक नगरे अधिनियम 1965 च्या कलम 57(5) अंतर्गत संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही प्रशासनाने दिला आहे.
नोटीस देण्यासाठी पथक पोहोचले पण….
जिल्हाधिकार्यांनी बजावलेली नोटीस बजावण्यासाठी नगराध्यक्षांच्या घरी पथक पोहोचले मात्र नगराध्यक्षा घरी नसल्याची माहिती मिळाली. नेमक्या प्रकाराबाबत नगराध्यक्षांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही.
