खुनाच्या गुन्ह्यातील भुसावळातील पसार कैदी 16 वर्षानंतर जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात
भुसावळ : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा जाहीर झालेल्या मात्र पॅरोलवर बाहेर आल्यानंतर तब्बल 16 वर्षांपासून पसार असलेल्या कैद्याच्या पुण्यातील शिरूर भागातून मुसक्या आवळल्या आहेत. भगवान हिरामण सपकाळे (रा.दिनदयाल नगर, जामनेर रोड, भुसावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
भुसावळ बाजारपेठ पोलिसात दाखल होता गुन्हा
1997 मध्ये भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला दाखल खूनाच्या गुन्ह्यात भगवान हिरामन सपकाळे यास अटक करण्यात आली व न्यायालयाने त्याला दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती. नाशिक मध्यवर्ती कारागृहात तो शिक्षा भोगत असताना 2 जून 2006 रोजी पॅरोल रजेवर कारागृहातून बाहेर आला मात्र पॅरोल रजेचा कालावधी पुर्ण झाल्यानंतरही कारागृहात परतला नाही त्यामुळे त्यास फरार घोषित करण्यात आले. तब्बल 16 वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत राहिला. आारोपी पसार झाल्याने त्याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला गु.र.नं. 182/2013 भा.द.वि. 224 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पसार कैदी भगवान सपकाळे हा शिरुर, पुणे येथे राहत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

यांनी केली कारवाई
जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार हवालदार लक्ष्मण अरुण पाटील, पोलिस नाईक रणजीत अशोक जाधव, नाईक किशोर ममराज राठोड, कॉन्स्टेबल विनोद सुभाष पाटील, चालक मुरलीधर सखाराम बारी आदींनी पुण्यातून फरार कैदी भगवान हिरामण सपकाळे (50, रा.दिनदयाल नगर, भुसावळ) याच्या मुसक्या आवळल्या. संशयीताला अधिक कारवाईसाठीभुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.