अहिरवाडीत भीषण आग ; 30 लाखांचे नुकसान
रावेर : तालुक्यातील अहिरवाडी येथे विविध कार्यकारी सोसायटीच्या गोदामात ठेवलेल्या मंडप व इतर साहित्याला गुरुवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत सुमारे 30 लाखांचे साहित्य जळून खाक झाले. अचानक लागलेल्या आगीमुळे गावात मोठी खळबळ उडाली.
आगीमुळे 30 लाख रुपयांचे नुकसान
अहिरवाडी येथील विकास सोसायटीच्या गोडाऊनमध्ये पाडळे येथील एका व्यक्तीने मंडप व इतर साहित्य ठेवले होते. गुरुवारी रात्री अचानक एक वाजेच्या सुमारास मोठी आग लागली. आग लागल्याची माहिती संदीप सावळे यांना समजताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सर्व मित्र मंडळीना उठवले व आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र आग मोठ्या प्रमाणावर पसरल्याने त्यांनी रावेर नगरपालिका व पोलिस स्टेशनला याची माहिती दिली. अग्निशमन दलाची गाडी अहिरवाडी येथे दाखल झाल्यानंतर आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने सावदा येथून अग्नीशामक दलाची गाडी पाचारण करण्यात आले व दोन तासांच्या अथक परीश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. अती उष्णतेमुळे आग लागली असावी, असा अंदाज ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. दरम्यान, बाळकृष्ण महाजन (पाडला) यांनी पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून त्यात 30 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तपास नितीन डांबरे करीत आहेत.
