माजी मंत्री खडसेंची प्रतिमा चालते मात्र पंतप्रधान, राष्ट्रपतींची का नाही ? मुक्ताईनगरात प्रतिमेवरून गाजली नगरपंचायतीची सभा
शिवसेनेच्या प्रश्नानंतर मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या सभेत गदारोळ ; मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांनी दिले आश्वासन
मुक्ताईनगर : नगरपंचायतीची विशेष सभा मंगळवार, 19 एप्रिल रोजी झाली. सभेत विविध विकासात्मक विषयांवर चर्चा सुरू असताना स्वीकृत नगरसेवक तथा भारतीय जनता पार्टीचे विधानसभा क्षेत्रप्रमुख ललित महाजन यांनी सभागृहात इतर फोटोंसह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे फोटो का लावले नाही ? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी प्रभारी नगराध्यक्ष मनीषा पाटील व मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांनी शासन परीपत्रक व ठराव पहावे लागतील, असे उत्तर देताच शिवसेना गटनेते राजेंद्र हिवराळे यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा फोटो कोणत्या शासकीय परीपत्रकानुसार व ठरावानुसार लावला घ असा सवाल उपस्थित करताच पालिकेत गदारोळाला सुरुवात झाली. बांधकाम सभापती संतोष मराठे यांनी हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची शासकीय कार्यालयात प्रतिमा लावणे व जयंतीला पूजन करावे याबाबतचे शासन परीपत्रक असून आपण फोटो का लावला नाही ? असा खडा सवाल उपस्थित करीत संबंधितांना धारेवर धरले. यावेळी पालिकेच्या सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. यावर लागलीच कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांनी आश्वासन दिले.
उद्यानाची नासधूस करणार्यांवर कारवाई होणार
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान देखभाल दुरुस्ती व साहित्य खरेदी करणे यावर चर्चा होत असतानाच गेटचे कुलूप तोडणार्या व येथे नासधूस करणार्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांनी सांगितले. सुशोभीकरण करताना उद्यानाचे नावाचे अॅक्रेलिक बोर्ड करून येथे कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना नगरसेवक मुकेश वानखेडे, ललित महाजन, निलेश शिरसाट, पियूष मोरे, संतोष मराठे शकील सर यांनी केल्या.

कर्मचारी नियुक्त करणार
उद्यानाच्या कर्मचार्यांकडून देखभाल, दुरुस्तीसह प्रवर्तन चौकातील शाहू, फुले, आंबेडकर या महामानवांच्या स्मारकांची साफसफाई व देखभाल दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम सभापती संतोष मराठे यांनी केली. यावर लेखापाल तथा स्वच्छ अभियान विभागाचे श्रीपाद मोरे यांनी सकारात्मकता दाखवून, अशा धर्तीवर कर्मचारी नियुक्त करणार असल्याचे सभागृहात सांगितले.