भुसावळ पालिकेच्या दिव्याखाली अंधार : एकाच ठरावाचे सूचक-अनुमोदक निघाले दोन
माहिती अधिकारात दिली चुकीची माहिती : दिनेश उपाध्याय यांची मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार ; मुख्याधिकार्यांचे निलंबन करण्याची मागणी
भुसावळ : माहिती अधिकारात अर्ज केल्यानंतर पालिका प्रशासनाने तक्रारदार व माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश उपाध्याय यांना चुकीची माहिती पुरवण्यात आल्यान त्यांनी भुसावळ पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचे निलंबन करावे व सेवा पुस्तकात तशी नोंद घ्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पुराव्यादाखल त्यांनी कागदपत्रेच दिल्याने मुख्याधिकार्यांच्या मात्र अडचणी वाढल्या आहेत.
माहिती अधिकारात दिली चुकीची माहिती
शहरात केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत हरीत क्षेत्र विकासासाठी राज्य शासनाने 26 मे 2017 रोजी भुसावळ पालिकेला 2 कोटी 50 लाख 44 हजार 180 निधी मंजूर केला. पालिकेने या निधीतून शहरात मौजे सतारेमधील सर्वे नंबर 10 मधील आरक्षण क्रमांक 23 क्रीडांगण (स्टेडियम) या जागेची हरीत क्षेत्र विकासासाठी निवड केली मात्र हे काम करताना क्रीडांगणाचे आरक्षण न बदलताच अटल उद्यान निर्मिती करण्यात आली. विशेष म्हणजे या उद्यानाचे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते लोकार्पण झाल्यानंतर 4 मार्च 2020 रोजी पालिकेने आरक्षण बदलाचा ठराव (क्रमांक 43) करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. माहिती अधिकार कार्यकर्ते उपाध्याय यांनी या संदर्भात माहिती अधिकार टाकल्यानंतर त्यांना पालिकेने दिलेल्या ठरावाच्या कागदपत्रात तत्कालीन नगरसेवक प्रा.दिनेश राठी व पी.पी.नेमाडे हे दोघे सूचक-अनुमोदक दर्शवण्यात आले आहे मात्र नगरपालिकेतून उपाध्याय यांनी माहिती घेतल्यानंतर त्यात एम.एन.पाटील व एच.एम.ठाकूर हे दोघे सूचक व अनुमोदक असल्याचे उघड झाले.

मुख्याधिकार्यांविरोधात दाखल व्हावा गुन्हा
माहिती अधिकार कार्यकर्त्यास नियमाप्रमाणे माहिती न देता चुकीची माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी उभयंतांची तक्रार केली मात्र प्रत्यक्षात मात्र खर्या कागदपत्रांवर वेगळ्याच लोकांची नावे असल्याने चुकीच्या लोकांची तक्रार करण्यात आल्याची बाब उपाध्याय यांच्या लक्षात आली. मुख्याधिकारी यांनी चुकीची माहिती दिल्याने त्यांच्याविरोधात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा, तसेच त्यांचे तातडीने निलंबन करावे व ‘अ’ पालिकेसाठी मुख्याधिकारी नाहीत, असा दावाही उपाध्याय यांनी तक्रारीत केला आहे. या संदर्भातील तक्रार व पुरावे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व नगर विकास विभागासह अन्य संबंधिताना ऑनलाईन पाठवण्यात आली आहे. दरम्यान, मुख्याधिकार्यांशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही.