धार्मिक स्थळांना रात्री दहा ते पहाटे सहापर्यंत ध्वनीक्षेपकाला परवानगी नाहीच
पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड : धार्मिक स्थळांबाबत शहरात बैठक
भुसावळ : कुठल्याही धार्मिक स्थळावर रात्री 10 ते सकाळी सहा या वेळात भोंगा वाजवू नये, सकाळी सहानंतर भोंगा वाजवायचा असेल तर पोलिसांची परवानगी यापुढे घेणे अनिवार्य असेल, अशा स्पष्ट सूचना भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड यांनी येथे दिल्या. शहरातील तेली समाज मंगल कार्यालयात शुक्रवारी सकाळी 11 वाजता तालुका पोलिस ठाणे, शहर पोलिस ठाणे व बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धार्मिक स्थळे, मंगल कार्यालये व डीजे व्यावसायीक यांच्या आयोजीत बैठकीत ते बोलत होते. पोलिस प्रशासनाकडून या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
लाऊड स्पीकरसाठी परवानगी आवश्यक
सुप्रीम कोर्टाच्या 2005 चे जजमेंटनुसार कुठल्याही धार्मिक स्थळावर वाद्या वा भोंगा वाजवायचा असेल तर यापुढे परवानगी घेणे अनिवार्य असेल, असे निरीक्षक गायकवाड म्हणाले. कोणत्याही धार्मिक स्थळांवर रात्री दहा ते पहाटे सहा दरम्यान लाऊड स्पीकर वा भोंगा लावून अजान, काकडा, आरती, भजन, कीर्तन वा डिजेवर गाणे लावता येणार नाही माच्त्र बंदिस्त हॉल, मंदिर, सिनेमागृहच्या आत स्पीकर लावलेले असल्यास त्यांना वाजविण्यास परवानगी घेण्याची गरज नाही. सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेल्या आदेशाव्यतिरिक्त वाद्या वाजवायचे असेल तर पोलिस स्टेशनमधून रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे. परवानगी नसेल तर कुठलेही वाद्या वाजविता येणार नाही, असे अधिकार्यांनी सांगितले. यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे, शहरचे निरीक्षक गजानन पडघण, बाजारपेठचे निरीक्षक राहुल गायकवाड उपस्थित होते.
