अंगावर आलेल्या भाजपला शिंगावर घेण्याची शिवसेनेची तयारी
भुसावळातील बैठकीत संपर्क प्रमुख गिरीष विचारे : काम न करणार्यांना दिल्या कानपिचक्या
भुसावळ : शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी तसेच राज्यात गेल्या अडीच वर्षात शिवसेनेनं केलेल्या आणि करत असलेल्या विकासात्मक कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यत पोहोचवण्यासाठी शिवसेनेने शिव संपर्क अभियान सुरू केले आहे मात्र इतकी वर्षे राजकारणात सोबत राहिल्यानंतर अंगावर आलेल्या भाजपला शिंगावर घेण्याची तयारी शिवसेना करीत असल्याची माहिती संपर्क प्रमुख गिरीष विचारे यांनी येथे दिली. भुसावळ विधानसभेसाठी संपर्क अभियान निरीक्षक म्हणून शिवसेना भवनातून त्यांची नियुक्ती करण्यात आली असून या अनुषंगाने बुधवारी भुसावळातील शासकीय विश्रामगृहात विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकार्यांना त्यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी पदाधिकार्यांना कामाला लागण्याचा संदेश देऊन पक्षाचे काम न करणार्या पदाधिकार्यांना कानपिचक्या दिल्या.
जिल्ह्यात बैठकांचे सत्र
आगामी जिल्हा परीषद, पंचायत समिती व पालिका निवडणुकीत अद्दल घडवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील विधानसभा मतदारसंघ शिवसंपर्क अभियानाचे नियोजन सुरू करण्यात आले. त्यासाठी जिल्ह्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकांचे सत्र सुरू असल्याचे विचार यावेळी म्हणाले. याप्रसंगी भुसावळ शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्तविक प्रा.उत्तम सुरवाडे यांनी केले.

शिवसेनेला बळकट करण्याचे आवाहन
शिवसेना पक्ष आणखी बळकट करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात, आणि वॉर्डात शिवसंपर्क अभियान प्रभावीपणे राबवा, मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून घेतलेले जनहिताचे निर्णय सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी केले. दरम्यान, गुरुवार, 26 मे रोजी साकेगाव व शुक्रवार, 27 मे रोजी वराडसीम येथे बैठक होणार आहे.
मुक्ताईनगरात रस्ता ओलांडताना भाविकाचा अपघाती मृत्यू







