भुसावळ शहरातील क्रीडा संकुल टाकणार कात

आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक : निविदा प्रक्रियेनंतर कामाला होणार सुरूवात


भुसावळ : आमदार संजय सावकारे यांनी शहरातील क्रीडा संकुलाबाबत माहिती जाणून घेण्यासाठी मंगळवारी शहरातील शासकीय विश्रागमृहात अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. क्रीडा संकुलाच्या कामासाठी सात कोटी 89 लाख 94 हजार 11 रुपयांच्या कामांना तांत्रिक मंजुरी मिळाली असून या कामांबाबत बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. निविदा प्रक्रिया मंजूर झाल्यानंतर कामांना जलदगतीने सुरूवात करावी, अशा सूचना आमदारांनी यावेळी दिल्या.

यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकीला तालुका क्रीडा समितीचे कार्याध्यक्ष तथा तहसीलदार दीपक धीवरे, जिल्हा क्रीडा अधिकारी तथा समितीचे सदस्य मिलींद दीक्षित, पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, गटविकास अधिकारी प्रतिनिधी के.पी.चौधरी, राजेंद्र फेगडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पी.यु.ठाकूर, तालुका क्रीडा अधिकारी मार्क धर्माई, तालुका समन्वयक बी.एन.पाटील, विनोद कुलकर्णी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

क्रीडा संकुलात होणार ही कामे
तालुका क्रीडा संकुल कामासाठी सात कोटी 89 लाख 94 हजार 11 रुपयांच्या कामाला मंजूरी मिळाली आहे. या कामांसाठी आता थेट निविदा प्रक्रिया निघणार आहे मात्र हे काम सुरू करताना प्रथम क्रीडा संकुलाची संरक्षण भिंत उभारणी करणे गरजेचे असल्याचे आमदार यांनी सांगत त्यानंतर कामांना सुरूवात करावी, अशी सूचना यावेळी केली. यामुळे संरक्षण भिंतीच्या कामाला प्रथम प्राधान्य दिल्यानंतर बास्केटबॉल, हँडबॉल, व्हॉलीबॉल, टेनीस, लाँग जंम्प, ट्रीपल जंम्प, रनींग ट्रॅक, जॉगींग ट्रॅक, कबड्डी, खो-खो, नेट क्रिकेट आदी मैदानांचे स्वतंत्र मैदाने तयार करण्याच्या सूचना आमदारांनी दिल्या.

आठवडाभरात प्रसिद्ध होणार निविदा
क्रीडा संकुलासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. एका आठवड्यात निविदा प्रसिद्ध होईल, असा अंदाज असून निविदा मंजूर झाल्यानंतर कामांना सुरूवात केली जाणार आहे. क्रीडा संकुलाची नासधूस थांबण्यासाठी सर्वात आधी संरक्षण भिंत बांधावी व गेट लावावे, अशी सूचना आजच्या बैठकीत करण्यात आली. डिसेंबर 2023 पर्यंत क्रीडा संकुल खुले व्हावे, असा प्रयत्न असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !