दोन हजारांची लाच घेताना हवालदार एसीबीच्या जाळ्यात
नाशिक : धनादेश न वटल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सहकार्य करण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारणार्या ओझर पोलिस ठाण्यातील हवालदार कारभारी भिला यादव (52, रा.नरहरीनगर, पाथर्डीफाटा) यांना लाच स्वीकारताच नाशिक एसीबीने अटक केली. पंचवटीतील सीतागुंफा परिसरात एसीबीच्या पथकाने रविवारी सापळा यशस्वी केला. या प्रकरणी यादव यांच्याविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सापळ्यात अडकला हवालदार
तक्रारदाराकडे संशयीत यादव यांनी दोन हजारांची मागणी केली होती. न्यायालयाने तक्रारदाराला पकड वॉरंट बजावले होते. त्यानुसार यादव यांनी तक्रारदाराशी संपर्क साधला व त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी पकड वॉरंटमध्ये जामीनदार यांचे कागदपत्रे घेऊन सहकार्य करण्याचे आमिष दाखविले. त्या मोबदल्यात यादव यांनी तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. यानंतर पथकाने खात्री पटविली आणि पंचवटीतील सीतागुंफा परिसरात रविवारी सापळा रचला. यादव यांनी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यांना पथकाने ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक साधना इंगळे, अंमलदार सचिन गोसावी, नितीन कराड, प्रवीण महाजन, प्रभाकर गवळी यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.