अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर
आषाढीनिमित्त भुसावळ विभागातील श्री विठ्ठल मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी ; साबुदाण्याची खिचडी व केळीचे वाटप
भुसावळ : आषाढी एकादशीनिमित्त भुसावळ विभागातील श्री विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांनी रविवार, 10 रोजी पहाटेपासून दर्शनार्थ गर्दी केली होती. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. दात्यांतर्फे भाविकांना ठिकठिकाणी केळी व साबुदाण्याच्या खिचडीचे वाटप करण्यात आले.
आषाढी एकादशी संत मुक्ताई दर्शनासाठी भाविकांची गर्दी
मुक्ताईनगर : तापी तिरावरील श्रीसंत मुक्ताबाई अंतर्धान समाधी स्थळावर श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर मूळ मंदिरात व मुक्ताईनगर येथील नवीन मुक्ताई मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी संत मुक्ताबाई दर्शन घेतले. देवशयनी आषाढी एकादशीस पंढरपूर ला देवाकडे जाता नाही आले तरी संताकडे गेल्याने संताचे व देवाचे दोघांचे दर्शन घडते म्हणून आदिशक्ती मुक्ताबाई मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर भाविकांच्या प्रचंड गर्दी फुलून गेले होते. मुलाबाळांसह महिलांची मोठी गर्दी झाली होती. तत्पूर्वी पहाटे काकड आरती भजनानंतर संत मुक्ताई महापूजा अभिषेक देवराम पाटील (नांदगाव) यांनी केली. दुपारी हभप रामेश्वर महाराज तिजारे, हभप. पंढरीनाथ महाराज (कोर्हाळा) यांचे प्रवचन व कीर्तन झाले. रात्री नागेश्वर भजनी मंडळाचा हरीजागराची भजन सेवा झाली. राजू पाटकर (मलकापूर), वत्सलाबाई देवराम पाटील यांनी भाविकांना साबुदाणा फराळ व मनोज महाजन (नाचणखेडा) यांनी केळी वाटप केले.

मुक्ताईस पहिल्यांदाच खजुराची आरास
माजी मंत्री आमदार एककनाथराव खडसे यांच्या शेतातील ताज्या ओल्या 250 किलो खजुराची आरास मुक्ताईस करण्यात आली. संत मुक्ताबाईस पहिल्यांदाच केलेली खजुराची आरास भाविकांसाठी आकर्षण ठरली. दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असतांनाही भाविकांचा उत्साहात कमी नव्हता. दिवसभर दर्शन बारी भरलेली होती. लाखावर भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती मूळ मंदिर व्यवस्थापक उध्दव महाराज जुनारे यांनी दिली.
पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
सावद्यात विठ्ठल मंदिरात भाविकांची मांदियाळी
सावदा ः शहरात आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रविवारी सकाळी येथील गांधी चौकातील विठ्ठल मंदिरात महापूजा व आरती झाली. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी येथे सुमारे दिड क्विंटल साबुदाणा व लाडू प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी मंदिरात सुंदर सजावट करण्यात आली. दिवसभर नागरीकांनी मंदिरात दर्शन घेतले. चितोडे वाणी समाज मंदिरातदेखील पांडुरंगाची महापूजा नितीन खरे व त्यांच्या पत्नी अर्चना खरे यांच्याहस्ते झाली. सायंकाळी शेकडो वर्षांच्या परंपरेप्रमाणे या मंदिरातून पालखी सोहळादेखील काढण्यात आला. दिवसभर शहरात विविध ठिकाणी देखील धार्मिक कार्यक्रम सुरू होते.
ओंकारेश्वर येथील महादेव मंदिरात गर्दी
रावेर : तालुक्यातील ओंकारेश्वर तामसवाडी महादेव मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पंचक्रोशीतून पायी दिंडीने भाविक वारकरी सहभागी झाले. परीसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ओंकारेश्वर तामसवाडी महादेव मंदिरात सकाळी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष विजय जगन्नाथ पाटील यांच्याहस्ते महादेव पिंडीचा अभिषेक व विठ्ठल मूर्तीची महापूजा करण्यात आली. मंदिराचे पुजारी मुकेश महाराज व मंदिर विश्वस्त मंडळ उपस्थित होते. या नंतर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली. दिवसभर भाविकांची रांग लागली होती.
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर निघाल्या दिंड्या
रावेर तालुक्यातील केर्हाळे, भोकरी, कर्जोद, अहिरवाडी, पाडळे, निरूळ, खानापूर, वाघोड, मोरगाव, तामसवाडी, पुनखेडा, पातोंडी, ऐनपूर, निंबोल, आजंदा, भाटखेडा, उटखेडा, चिनावल, विवरे, रमजीपूर, बक्षीपूर, रसलपुर या गावांमधुन टाळ, मृदुंग, विणेसह विठु नामाच्या गजरात दिंड्या आल्या. यात पुरूष महिलासह आबालवृद्ध, वारकरी सहभागी झाले होते. यासह पंचक्रोशीतुन काही भाविक पायी तसेच वाहनांमधून दिवसभर येत होते. मंदिरात ह.भ.प.सुधाकर महाराज (नशिराबाद) यांचे वहर्तन झाले. महेंद्र पाटील केक्षयहाळे यांच्याकडून फराळ, तर बारी समाज रावेर यांच्याकडून चहाचे वाटप भाविकांना करण्यात आले.
बोदवडमध्ये दिंडी सोहळा
बोदवड : शहरातील राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित श्री गौरीशंकरजी गंगारामजी अग्रवाल प्राथमिक विद्यामंदिर व सर सत्यजित राम नेमाडे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. रविवारी श्री गजानन महाराज मंदिरापासून दिंडी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. पालखीचे पूजन राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनंतराव कुळकर्णी यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे संचालक मंगलसिंग पाटील, श्री गजानन महाराज सेवा संस्थेचे संचालक चंद्रकांत राखोंडे तसेच परीसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखी पूजनानंतर दिंडी शहरातील विठ्ठल मंदिराकडे मार्गस्थ झाली. या सोहळ्यात टाळ मृदुंगाच्या गजरात व वारकरी पोशाखात विद्यार्थ्यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. पालखी विठ्ठल मंदिरात पोहोचल्यानंतर श्री अनिकेत कुळकर्णी व सीमा कुळकर्णी यांच्याहस्ते आरती करण्यात आली. या प्रसंगी बोदवड येथील श्री गजानन महाराज सेवा संस्थ्येचे अध्यक्ष अनिल खंडेलवाल उपस्थित होते. पालखी मार्गात संजय क्लाथ सेंटरच्या संचालकांकडून विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले. आरतीनंतर विठ्ठल मंदिरात विद्यार्थ्याां गजानन तायडे यांच्यातर्फे फराळाचे वाटप करण्यात आले. दिंडी सोहळा यशस्वीतेसाठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक आर.टी.बडगुजर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक डी.एच.चौधरी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विठ्ठल रखुमाई वारकरी मंडळ, बोदवड यांचे सहकार्य लाभले.