भुसावळातील अट्टल चैन चोर इराणी देवास पोलिसांच्या जाळ्यात
पाच लाखांचा मुद्देमाल जप्त : आरोपींवर राज्यभरात चैन चोरीचे गुन्हे
भुसावळ : भुसावळातील अट्टल चैन चोर इराणींच्या देवास पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींच्या ताब्यातून चार चैन व मंगळसूत्रासह दोन दुचाकी मिळून तब्बल पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे. अटकेतील आरोपींवर राज्यभरात 30 ते 35 गुन्हे दाखल आहेत. देवास शहरात वाढलेल्या चैन चोरीच्या वाढत्या घटनेनंतर गोपनीय माहितीवरून आरोपींना अटक करण्यात आली. सादिक इबादत अली (23, पापा नगर, भुसावळ) व अब्बास इबादत अली (23, पापा नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
देवास जिल्ह्यात पाच ठिकाणी चोर्यांची कबुली
आरोपींनी देवास जिल्ह्यात दोन ठिकाणी तर रतलाम जिल्ह्यात देान तसेच उज्जैन शहरात एक चोरी केल्याची कबुली दिली आहे. उज्जैन झोनमध्ये वाढलेल्या चैन चोरीच्या घटनानंतर महिलावर्गात मोठी भीती पसरली होती. या पार्श्वभूमीवर उज्जैन पोलिस महानिरीक्षक राकेश गुप्ता यांनी या संदर्भात सर्व पोलिस अधीक्षकांना सूचना केल्या होत्या व एक विशेष पथक आरोपींच्या अटकेसाठी कार्यरत करण्यात आले. चोरी झालेल्या ठिकाणावरून आरोपींची छबी, गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन व कपड्यांच्या वर्णनानंतर पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. 28 नोव्हेंबर रोजी कैलादेवी मंदिराजवळ आरोपी आल्यानंतर घेराव घालून त्यांना अटक करण्यात आली.



गर्दी नसलेल्या ठिकाणी चोरी
आरोपी गर्दी नसलेल्या ठिकाणांची दिवसभर रेकी करायचे व नंतर एकटी महिला दिसताच चैन व मंगळसूत्र लांबवायचे. आरोपी चोरी केल्यानंतर इंदौरस्थित नातेवाईक मुश्ताक अन्सारी यांच्याकडे मुक्काम केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी सादीकविरुद्ध भुसावळ, जळगाव, मुंबई, मध्यप्रदेशात गुन्हे दाखल आहेत तर दुसरा आरोपी अब्बासविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल असल्याचे सूत्रांनी सांगितले.
