व्हर्च्युअल चॅटिंगच्या युगात गप्पांना जागाच नसल्याने संवाद हरवलाय
द्वारकाई व्याख्यानमाला : औरंगाबादचे कवी ध. सु. जाधव यांनी भुसावळात गुंफले द्वितीय पुष्प
भुसावळ : आजच्या पिढीतला हरवलेला संवाद आणि आपुलकीहीन जीवनशैली माणसांमध्ये दुरावा निर्माण करीत आहे. व्हर्च्युअल चॅटिंगच्या युगात गप्पांना जागाच नसल्याने संवाद हरवत चालला आहे. नाती तुटत चालली आहेत. ती टिकवून ठेवण्यासाठी निकोप संवाद व्हायला हवा, असे परखड मत औरंगाबाद येथील कवी ध. सु. जाधव यांनी येथे केले. भुसावळात जय गणेश फाउंडेशनतर्फे द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ तीन दिवसीय फिरती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्यात बुधवारी ‘चला संवादी होऊ या’ या विषयावर द्वितीय पुष्प गुंफताना कवी जाधव हे बोलत होते. शहरातील रा.गं.झांबरे विद्यालयात हे पुष्प गुंफण्यात आले. अध्यक्षस्थानी संचालक ए. एन. शुक्ल होते.
यांची विचार मंचावर उपस्थिती
विचार मंचावर सचिव बी.जी.सरोदे, संचालक जे.एच.चौधरी, प्राथमिक विभागाचे चेअरमन संजय पाटील, संचालक डॉ.के.जी.झांबरे, सल्लागार एस.आर.झांबरे होते. शाळेतर्फे मुख्याध्यापक एस.बी.कुमावत यांनी वक्त्यांचा सत्कार केला. प्रास्ताविक जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केले. सूत्रसंचालन मनीष गुरचळ, आभार समन्वयक गणेश फेगडे यांनी मानले.



शेरोशायरी आणि कवितांना भरभरून दाद
कवी जाधव यांनी सुरुवातीलाच यामिनी दळवी यांची ‘आई असते ओली माती’ ही कविता सादर करून रसिकांचे लक्ष वेधले. त्यानंतर शायर मुनव्वर राणा यांचा ‘ए अंधेरे देख ले मुँह तेरा काला हो गया, माँ ने आँखे खोल दी घर में उजाला हो गया’ हा शेर खास शैलीत सादर करून टाळ्या मिळवल्या. या शेरमधून त्यांनी आईची महती वर्णन केली. गुरु ठाकूर यांची ‘असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर’ ही कविताही सादर केली.
‘रुमाल’ कवितेतून मांडलं शेतकर्यांचं दु:ख
‘रुमाल’ ही कविताही त्यांनी सादर केली. त्यातील ‘कमाल आहे वर्षानुवर्ष माझ्या बा’च्या गळ्यात फाटकाच रुमाल आहे’ या ओळी काळजाचा ठाव घेणार्या ठरल्या. पोट खपाटीला गेलेला बाप घामाच्या धारांनी अंघोळ करतो. राबराब-राबून धनधान्याच्या राशी पिकवतो पण तरीही त्याच्या गळ्यातील फाटका रुमालाची अवस्था बदलत नाही हे त्यांनी त्यातून अधोरेखीत केले. जीवनात कितीही वेळा अपयश आले तरी खचून जाऊ नये. नव्या उमेदीने पुन्हा प्रयत्न केले तर यश मिळते, असा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
ग्रामगीता, अग्निपंख ही पुस्तके जरूर वाचा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेला समाजप्रबोधनाचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी ग्रामगीता घरोघरी वाचली गेली पाहिजे. अग्निपंख, आमचा बाप आन् आम्ही अशी पुस्तके विद्यार्थ्यांनी जरूर वाचली पाहिजे, असे आवाहनही कवी जाधव यांनी केले. गझलकार आबेद शेख यांच्या ‘यार हो क्षमा करत चला, माणसे जमा करत चला’ या ओळीही त्यांनी सादर केल्या. माणसं जोडण्याचा व चांगल्या विचारांची माणसं पेरण्याचा संदेश त्यांनी दिला. महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.