जळगाव जिल्ह्यातील दहा वर्षातील गुन्हेगारांवर पहाटे धाड : सात गावठी कट्टे, 11 जिवंत काडतूससह चाकू व तलवार जप्त

‘ऑपरेशन 3/25’ : 24 संशयितांची अचानक तपासणी, 7 आरोपींवर कारवाई


Jalgaon Police Operation 3/25 जळगाव (बुधवार 13 ऑगस्ट 2026) : जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी जिल्ह्याचे डॅशिंग पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कंबर कसली आहे. एकीकडे ड्रग माफियांसह अवैध धंद्यांवर कारवाईसत्र सुरू असतानाच जिल्हा पोलीस दलाने गत दहा वर्षातील गुन्हेगारी पार्श्वभूमी लाभलेल्या 214 आरोपींच्या घरात गुरुवारी पहाटे छापेमारी केली. यावेळी सात गुन्हेगारांकडून गावठी कट्ट्यांसह 11 काडतूस तसेच चाकू, तलवार, 25 मोबाईल व तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. साखर झोपेतील गुन्हेगारांच्या भल्या पहाटेच यंत्रणेने मुसक्या बांधल्यानंतर गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली.

विशेष कारवाईने उडाली खळबळ
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम ठेवण्यासोबतच बेकायदेशीर अग्निशस्त्रांचा वापर, बाळगणे तसेच शस्त्रांशी संबंधित गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी जळगाव पोलिसांनी ‘ऑपरेशन 3/25’ ही विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबविली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी पहाटेपासून जिल्हाभरात पोलिसांच्या विशेष पथकांनी कारवाई केली.






10 वर्षांतील शस्त्र गुन्हेगारांची माहिती संकलित
जळगाव जिल्ह्यात मागील 10 वर्षांच्या कालावधीत भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल असलेल्या तसेच बेकायदेशीर अग्निशस्त्रांच्या वापराशी संबंधित गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची माहिती पोलिसांनी संकलित केली. त्यानुसार संबंधित व्यक्तींची यादी तयार करून त्यांच्या सध्याच्या वास्तव्याची माहिती घेण्यात आली. तसेच संबंधित व्यक्तींनी शस्त्रे स्वतःकडे ठेवली आहेत का, नातेवाईक अथवा परिचितांकडे लपवून ठेवली आहेत का, याबाबत उपलब्ध माहितीच्या आधारे आवश्यक त्या ठिकाणी कायदेशीर प्रक्रियेनुसार झडती व तपासणी करण्यात आली.

पहाटेपासून जिल्हाभरात अचानक तपासणी
गुरुवारी सकाळी सुमारे 6 वाजेपासून ‘ऑपरेशन 3/25’ सुरू करण्यात आले. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष पथके एकाच वेळी रवाना करण्यात आली. मागील 10 वर्षांच्या कालावधीत शस्त्र बाळगणे किंवा शस्त्रांच्या माध्यमातून गुन्हे करणार्‍या एकूण 24 आरोपींच्या घरी, वास्तव्याच्या ठिकाणी तसेच त्यांच्या ताब्यातील वाहनांची अचानक तपासणी करण्यात आली.

अशी झाली कारवाई

  • भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील किशोर उर्फ गोजोर्‍या सकरू जाधव याच्याकडून एक गावठी कट्टा व दोन जिवंत राऊंड मिळून 37 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
  • वरणगाव पोलीस ठाणे हद्दीतील रोशन विकास पाटील (26, ओझरखेडा) याच्याकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत राऊंड मिळून एकूण 32 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला..
  • जळगाव एमआयडीसी हद्दीतील राजकिरण मानसिंग परदेशी (26, रायपूर, जि.जळगाव) कडून 30 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला.
  • स्थानिक गुन्हे शाखेने एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील रईस रफिक तांबोळी (21, सुप्रीम कॉलनी, जळगाव) दोन गावठी कट्ट्यांसह दोन जिवंत राऊंड मिळून अंदाजे 62 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
  • चाळीसगाव शहर पोलीस ठाणे हद्दीतील प्रथमेश लक्ष्मण भामरे (20, श्री स्वामी समर्थ नगर, चाळीसगाव) याच्याकडून दोन गावठी कट्टे, सहा जिवंत राऊंड व दोन चाकू असा 72 हजार 300 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
  • चाळीसगाव शहर पोलीस ठाणे हद्दीतील जयेश किरणसिंग राजपूतकडून तीनशे रुपये किंमतीची एक तलवार जप्त करण्यात आली.
  • चाळीसगाव शहर पोलीस ठाणे हद्दीतील दीपक सुभाष मरसाळे (30, सुवर्णाताई नगर, चाळीसगाव) कडून 25 मोबाईल फोन व 3 मोटारसायकली असा एकूण चार लाख 86 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सात आरोपींवर कारवाई : दहा लाखांचा मुद्देमाल जप्त
या विशेष मोहिमेत एकूण सात आरोपींवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सात गावठी कट्टे, 11 जिवंत राऊंड, 2 चाकू, 1 तलवार, 25 मोबाईल फोन आणि तीन मोटारसायकली असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 9 लाख 19 हजार 600 रुपये असल्याचे पोलीस प्रशासनाने नमूद केले आहे.

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सातत्याने कारवाई
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांना गुन्हेगारांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या, बेकायदेशीर शस्त्रांचा शोध घेण्याच्या तसेच संभाव्य गंभीर गुन्हे घडण्यापूर्वी प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जळगाव पोलिसांकडून भविष्यातही अशाच प्रकारच्या अचानक, लक्षित आणि माहितीच्या आधारे विशेष मोहिमा राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीविरुद्ध कठोर व प्रभावी कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

यांचा विशेष मोहिमेत सहभाग
या विशेष मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव विभागातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा आणि जळगाव येथील अधिकारी-अंमलदार यांच्या विशेष पथकांनी सहभाग घेतला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !