पामीच्या शस्त्रक्रियेमुळे 65 वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश


जळगाव (गुरुवार, 13 ऑगस्ट 2026) : छातीत तीव्र वेदना सुरू झाल्याने गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या 65 वर्षीय रुग्णाचे प्राण डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांनी वेळेत केलेल्या पामी शस्त्रक्रियेमुळे वाचविण्यात यश मिळविले आहे. हृदयाला रक्तपुरवठा करणारी प्रमुख रक्तवाहिनी 100 टक्के बंद झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाल्यानंतर तातडीने करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला नवजीवन मिळाले.

अशी आहे रुग्णाची हिस्ट्री
यावल तालुक्यातील सुभाष नामक 65 वर्षीय रुग्णाला अचानक छातीत तीव्र दुखणे, घाम येणे आणि अस्वस्थता जाणवू लागल्याने त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील आपत्कालीन विभागाने त्वरित उपचार सुरू करत हृदयालयाचे प्रमुख डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अदनान अली आणि डॉ. झिशान यांना पाचारण केले. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने तत्काळ ईसीजी, रक्त तपासण्या आणि इतर आवश्यक चाचण्या करण्यात आल्या.तपासणी अहवालातून रुग्णाला तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाले. त्यानंतर करण्यात आलेल्या अँजिओग्राफीमध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणारी एक महत्त्वाची कोरोनरी रक्तवाहिनी 100 टक्के ब्लॉक झाल्याचे आढळून आले.






या स्थितीत उपचारास विलंब झाल्यास हृदयाच्या स्नायूंना कायमस्वरूपी नुकसान होण्याचा तसेच रुग्णाचा जीव धोक्यात येण्याचा संभव असल्याने डॉक्टरांनी तातडीने पामी करण्याचा निर्णय घेतला. हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अदनान अली आणि डॉ. झिशान यांनी अनुभवी वैद्यकीय पथकाच्या सहाय्याने अत्याधुनिक कॅथलॅबमध्ये यशस्वीरीत्या पामी शस्त्रक्रिया पार पाडली.

शस्त्रक्रियेदरम्यान बंद झालेल्या रक्तवाहिनीतील अडथळा दूर करण्यात आला आणि आवश्यकतेनुसार स्टेंट बसवून रक्तप्रवाह पूर्ववत करण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून छातीतील वेदना पूर्णपणे कमी झाल्या आहेत. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्यांना पुढील वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार देण्यात येत आहेत.

वेदना जाणवल्यास तातडीने घ्यावा सल्ला
हृदयविकाराच्या झटक्याच्या रुग्णांमध्ये प्रत्येक मिनिट अत्यंत महत्त्वाचा असतो. रक्तवाहिनी पूर्णपणे बंद झाल्यानंतर जितक्या लवकर उपचार केले जातात तितके हृदयाचे नुकसान कमी होते. संबंधित रुग्णाला वेळेत रुग्णालयात आणण्यात आले आणि तातडीने पामी शस्त्रक्रिया केल्यामुळे त्यांचे प्राण वाचविणे शक्य झाले. छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, घाम येणे किंवा डाव्या हातात वेदना जाणवणे अशी लक्षणे दिसल्यास नागरिकांनी वेळ न दवडता त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे डॉ. अदनान अली म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !