हर घर तिरंगा मोहिम संघाच्या नागपूर शाखेपासून सुरुवात करावी
भुसावळातील काँग्रेस पदाधिकारी विवेक नरवाडे यांची पत्राद्वारे मागणी
भुसावळ : ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेचे स्वागत असून केंद्रातील सरकार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा प्रणित मोदी सरकार असल्याने हर घर तिरंगा ही मोहीम काढून जणू देशात पहिल्यांदाच तिरंगा ध्वज फडकला जात असल्याची चुकीची भावना सर्वसामान्य लोकांत पसरवण्याचा खोडसाळ प्रयत्न केला जात असल्याचे स्पष्ट मत जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांनी पत्रकातून व्यक्त केले आहे.
संघ शाखेपासून करावी सुरूवात
देशाच्या स्वतंत्र चळवळीचा इतिहास लाभलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले आहे शिवाय तिरंगा ध्वज कायम डोलात फडकवण्याचे काम राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने इथे केले आहे. हर घर तिरंगा ही मोहीम अगदी मनातून असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा यांच्या नागपूरच्या संघ शाखेच्या कार्यालयावर तिरंगा ध्वज फडकत मोहिमेची सुरुवात करावी अन्यथा हर घर तिरंगा ह्या मोहीम राबवण्याचा नैतिक अधिकार मोदी सरकारला नाही, असा घणाघात जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडेे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे.

