शेतीत पाणी शिरल्याने शेतकर्‍यांनी सुरत-नागपूर महामार्ग रोखला


Farmers blocked the Surat-Nagpur highway due to inundation of agriculture धुळे : बारा हेक्टर क्षेत्रात शनिवारी पाणी शिरल्याने चाळीतील कांदा, मका, बाजरी, कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकर्‍यांनी भरपाईसाठी सुरत-महामार्ग रोखत महामार्ग प्राधिकरणाविषयी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे वाहतूक बराचवेळ ठप्प झाली होती.

शेती पिकांचे नुकसान
शनिवारी कुसुंबा, ता.धुळे परीसरात रात्री 110 मिलीमीटर पाऊस झाल्याने कुसुंबा व मोराणे शिवारातील लेंडी-बुरखडी नाल्यांना पुरस्थिती निर्माण झाल. महामार्गालगत केलेल्या साईड रोडवर पाणी निघून जाण्यासाठी टाकलेल्या पाईपद्वारे पाणी व्यवस्थित न निघाल्याने नाला तुंबून पाणी थेट शेतीत गेल्याने 12 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले. रस्ताही वाहून गेल्याने संतप्त शेतकरी अचानक महामार्गावर आंदोलनाला बसले. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली.

अधिकार्‍यांची आंदोलनस्थळी धाव
यावेळी पोलीस उपनिरीक्षक विजया पवार, सागर काळे, विशाल गुरव यांनी आंदोलकांना समज देऊन वाहतूक सुरळीत केली. राजमार्ग प्राधिकरणाचे साईड इंजिनिअर यशोदीप पाटील यांना निवेदन देऊन तात्काळ रस्ता दुरुस्ती करून नुकसान भरपाईची मागणी केली. यावेळी लगेच रस्ता दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी शेतकरी महेंद्र परदेशी, रोहित परदेशी, सुधाकर परदेशी, ग्रा.पं. सदस्य रमेश चौधरी, डॉ.पंकज शिंदे, रामचंद्र महाले, कुणाल शिंदे, संजय शिंदे, जगदिश शिंदे, शशिकांत सैंदाणे,डिंगबर परदेशी, रोशन शिंदे, निखिल शिंदे, चेतन शिंदे, विनोद पाटील, मोसीम शेख, मोहम्मद शेख, ज्ञानेश्वर जिरे, संदिप ठाकरे, ललित शिंदे, प्रथमेश शिंदे, दिनेश चित्ते, तेजस शिंदे आदी शेतकर्‍यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, 5 रोजी 110 तर 4 रोजी 85 मिलीमीटर पाऊस झाला. शेतकर्‍यांच्या शेतात पाणी शिरल्याचे समजताच मंडळाधिकारी किरण कामळे, तलाठी महेंद्र पाटील यांनी पाणी शिरलेल्या 12 हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तात्काळ पंचनामा केल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !