एस.टी.प्रशासनाने स्मार्ट कार्ड योजना पूर्ववत सुरू करावी

प्रा.धीरज पाटील यांचे व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन


भुसावळ : ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमात हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळाने 2018-2019 मध्ये स्मार्ट कार्डच्या माध्यमातून सुमारे 29 विविध सामाजिक घटकांना 33 टक्क्यांपासून 100 टक्क्यांपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत लागू केली होती. यात ज्येष्ठ नागरीक, विद्यार्थ्यांसह दिव्यांग, कर्करोग व इतर दुर्धर आजारग्रस्त, स्वातंत्र्यसैनिक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहिद सन्मान योजना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त, अधिस्वीकृतीधारक अशा विविध सवलतधारकांचा समावेश आहे. या सवलतीसाठी प्रवाशांना स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे मात्र सर्व्हर डाऊनचा बहाण करून हे कार्ड दिले जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात शिवसेनेचे तालुका संटघक प्रा.धीरज पाटील यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्याकडे तक्रारवजा निवेदन दिले आहे.

सर्व्हर डाऊनचा बहाना
एस.टी.च्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला 30 ऑगस्ट 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली मात्र, यावेळची मुदतवाढ अंतिम असल्याचे महामंडळाने जाहीर केले आहे. सर्व्हर बंदचा बहाणा पुढे करीत स्मार्ट कार्ड देणे बंद करण्यात आले. नागरीकांच्या या समस्येवर उपाय म्हणून शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी भुसावळ शहर बस स्थानकात चौकशी केली असता कॉन्ट्रॅक्ट नूतनीकरण किंवा मुदतवाढ मिळाल्याशिवाय वेबसाईटवर नवीन स्मार्ट कार्डची नोंदणी वा नूतनीकरण सुरू होणार नाही, अशी माहिती कंपनीच्या प्रतिनिधीने दिली आहे.

मुदतवाढीचा फायदा तरी काय?
1 सप्टेंबर 2022 पासून स्मार्ट कार्ड बंधनकारक असेल परंतु मागील एका महिन्यापासून वेबसाईटच बंद आहे तर हे काम होणार असे? मुदतवाढीचा फायदा तरी काय? अशी लाभार्थींची ओरड आहे. स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी येणार्‍या सर्व अडचणी दूर करून ही सुविधा पूर्वरत सुरू करावी तसेच 1 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदतवाढ देऊन नागरीकांना दिलासा द्यावा, अश्या मागणीचे निवेदन तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्याकडे सादर केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !