पिंपळकोठा गोळीबार प्रकरण : मुख्य आरोपी जाळ्यात


पारोळा : तालुक्यातील पिंपळकोठा येथे यात्रोत्सवात गोळीबार करणार्‍या सागर संजय पाटील (रा.अमळनेर) यास पारोळा पोलिसांनी कन्नड, जि.औरंगाबाद येथून शुक्रवारी अटक केली आहे. पिलुकदेव महाराज यात्रेदरम्यान पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणात आरोपी सागर संजय पाटील (रा.अमळनेर) व सोबतच्या चार आरोपींनी भांडण सोडविण्यास गेलेले चेनेश्वर पाटील यांच्या पोटात गावठी कट्ट्याने फायर करून गंभीर जखमी केले होते. यानंतर आरोपी चोरीच्या मोटारसायकलवर पसार झाले होते. म्हणून त्यांच्याविरूद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील बाळा उर्फ तुषार प्रदीप पाटील (रा.नवलनगर, ता.धुळे) यास धुळे येथून तसेच अल्पवयीन आरोपी यास शिर्डी येथे जाऊन सावळी फाटा भागातून ताब्यात घेण्यात आले होते.

कन्नडमधून आवळल्या मुसक्या
पारोळा पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे व पारोळा पोलिसांच्या गुन्हे शोध तपास पथकातील कर्मचार्‍यांनी गुप्त माहितीच्या आधारे मुख्य आरोपी सागर संजय पाटील (रा.अमळनेर) यास कन्नड (जि.औरंगाबाद) येथील बसस्टॉप जवळून शुक्रवार, 6 रोजी अटक केली. ही कारवाई पारोळा पोलिस ठाण्यातील हवालदार रवींद्र रावते, पंकज राठोड, सुनील साळुंखे, किशोर भोई, राहुल कोळी आदींनी केली. दरम्यान, या गुन्ह्यातील पाचही आरोपींना पकडण्यात यश आले असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !