शिक्षणाधिकार्यांनी केलेल्या बेकायदेशीर कामाची शिक्षा शिक्षकांना का ?
भुसावळातील शिक्षण तज्ज्ञ प्र.ह.दलाल यांचा संतप्त सवाल!
भुसावळ : शिक्षक पात्रता परीक्षा (टी.ई.टी.) मधील वरीष्ठ अधिकार्यांचे भ्रष्टाचार प्रकरण अद्यापही सुरूच असताना तत्कालीन शिक्षणाधिकारी डी. पी.महाजन यांनी नियम बाह्य पद्धतीने जानेवारी2 015 ते डिसेंबर2019 दरम्यान शिक्षकांना दिलेल्या मान्यता रद्द करून त्यांची नोकरी समाप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्ह्यात असे 125 शिक्षक असल्याची माहिती आहे.. चूक अधिकार्यांनी करायची अन् शिक्षा मात्र शिक्षकांनी भोगायची हा कुठला न्याय? असा प्रश्न भुसावळातील शिक्षण तज्ज्ञ प्र.ह.दलाल यांनी उपस्थित केला आहे.
शिक्षकांना ही शिक्षा का ?
दलाल यांनी कळवल्यानुसार वर्तमानपत्रात आलेली जाहिरात वाचून पात्रता असलेले उमेदवार संबंधित संस्थेच्या मुलाखतीला गेले व त्यावेळी संस्थेच्या अंतर्गत बाबींची माहिती त्यांना नव्हती. संस्थेने रोस्टर ठेवले की नाही?अनुशेष भरलेला आहे किंवा कसे? त्या शाळेतील कोणते शिक्षक कधी निवृत्त झाले? ही व अश्या प्रकारची माहिती त्यावेळी त्यांना कशी असेल? सर्व सोपस्कार पार पडल्यावर संस्थेने त्यांना नेमणूक पत्र दिले व ते शाळेत रुजू झाले. नंतर मुख्याध्यापकांनी त्यांचा प्रस्ताव शिक्षणाधिकार्यांना पाठवला त्यामुळे ही प्रशासकीय प्रक्रिया असून शिक्षकांचा या प्रकाराशी काहीही संबंध नाही.

शिक्षेची कुर्हाड अधिकार्यांवर उचलावी
संस्थाचालक/मुख्याध्यापक यांची ही जवाबदारी आहे व शिक्षणाधिकारी जर आपल्या कर्तव्यात चुकत असतील, नियमबाह्य मान्यता देत असेल तर त्यास संबंधित अधिकारीच जबाबदार का नाही? शासनाने बेजवाबदार अधिकार्यांवर शिक्षेची कुर्हाड उचलण्याचे सोडून शिक्षकांचे संसार का म्हणून उद्ध्वस्त करण्याचा प्रघात सुरू केला आहे ? असा प्रश्न दलाल यांनी उपस्थित केला आहे. आधी स्वतःच्या अधिकार्यांना शिस्त लाऊन भ्रष्टाचाराची उघड उघड मांडलेली दुकाने बंद करायला हवी अन्यथा शिक्षणक्षेत्रात प्रचंड अराजकता माजून त्याचे दुष्परीणाम सर्व समाजाला भोगावे लागतील, असे प्र. ह.दलाल यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.